नाशिक : तथागत गौतम बुद्धांची ज्ञानसंकल्पना विज्ञानावर अवलंबून असून, बुद्ध तत्त्वज्ञानाचा केंद्रबिंदू हा माणूस असल्याचे प्रतिपादन भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी बी. जी. वाघ यांनी केले.
डिजिटल वसंत व्याख्यानमालेत ते बोलत होते. स्व. स्मिता चंद्रकांत जाधव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांनी सव्विसावे पुष्प गुंफले. बुद्धपौर्णिमेचे औचित्य साधून वाघ यांनी सिद्धार्थाचा जन्म, तेव्हाची सामाजिक परिस्थिती, सिद्धार्थाचे वैभव, रोहिणी नदीचा वाद या घटनांचा आढावा घेतला. ज्ञान मिळविणे, दुःखावर उपाय शोधणे यातून स्वतःबद्दल प्रश्न निर्माण झाल्याने सिद्धार्थाने गृहत्याग केला. मानवी जीवनाचे दुःख काय आहे हे जाणून त्यांनी जगाच्या कल्याणाकरिता राजवाडा सोडला, असे वाघ यांनी स्पष्ट केले.
सात वर्षे तपश्चर्या करूनही जीवनाचे तत्त्वज्ञान प्राप्त झाले नाही, चार आठवडे पिंपळ वृक्षाखाली गौतमाने चिंतन केले, तेव्हा विश्वव्यवस्था ठराविक नियमांनी काम करते, असे त्यांच्या लक्षात आले. सर्व तत्त्वज्ञानात काल्पनिक गोष्टींवर भर असून, त्यात माणसाच्या जीवनाचा विचार केला गेलेला नाही. वेदात भौतिकतेचा विचार नाही. सत्य ठोस पाहिजे, इहवादी तत्त्वज्ञान बुद्धांना मान्य असल्याचे वाघ यांनी सांगितले.
स्वतःचा बौद्धिक, नैतिक विकास बुद्धांनी विकसित केला. त्यासाठी अष्टांग मार्ग त्यांनी आखून दिलेत. या मार्गांचा अवलंब केल्यास सामान्य माणूसही बुद्ध होईल, अशी बुद्धांची अपेक्षा होती. वेद, वर्णव्यवस्था, आत्मा, ईश्वर, पुनर्जन्म या बाबी बुद्धांनी स्पष्ट नाकारल्या. तर्क, विवेक आणि कार्यकारणभाव ही विचारसरणी त्यांनी उभी केली, म्हणून बुद्ध बंडखोर असल्याचे वाघ म्हणतात. बौद्ध धर्माचा प्रभाव येशू ख्रिस्त, मोहम्मद पैगंबर तसेच हिंदू धर्मावरही आहे. एकूणच बुद्ध तत्त्वज्ञानाचा प्रभाव जगावर, विचार व्यवस्थेवर आहे. हा मोठा ठेवा असल्याचे मत वाघ यांनी व्यक्त केले. बुद्ध उपदेशात, मी सांगतो ते खरे मानू नका. सत्याची पडताळणी करा. असे झाल्यास माणूस वस्तुस्थितीकडे पाहतो आणि मध्यावर येऊन ठेपतो आणि तोच अष्टांग मार्ग आहे. म्हणूनच प्रत्येकात बुद्ध होण्याची क्षमता असून अशी विचार व्यवस्था बुद्धांनी निर्माण केली. जगात बौद्ध धर्म वेगवेगळ्या प्रकारात सांगितला जातो आणि जग त्याचे अनुसरण करते, असेही बी. जी. वाघ यांनी स्पष्ट केले. यावेळी डॉ. विक्रांत जाधव उपस्थित होते. अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले, तर चिटणीस संगीता बाफना यांनी आभार मानले.
आजचे व्याख्यान
वक्ते - ॲड. अविनाश भिडे
विषय - सुखांत जीवनाचा
फोटो
२६वाघ