नाशिक : साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा नाशिकरोड परिसरात बसविण्याबाबत महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या विलंबाच्या निषेधार्थ जनहित लोकशाही पार्टीच्या वतीने राजीव गांधी भवनाच्या द्वारावर ‘ढोल’ बडविण्यात आले.महापालिकेने महासभेमध्ये नाशिकरोड येथे साठे यांचा पुतळा बसविण्याच्या ठाराव मंजूर केला आहे. गेल्या आठ महिन्यांपासून याबाबतचा प्रस्ताव पालिकेच्या प्रशासनाकडून तयार करण्यात आला नाही. त्यामुळे प्रस्ताव राज्य शासनाच्या योग्य त्या कार्यवाहीसाठीदेखील पाठविला जात नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. महापालिकेने तातडीने नाशिकरोड येथे साठे यांचा पुतळा उभारण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून महाराष्ट्र कला संचलनालयाकडे पुढील मंजुरीसाठी पाठवावा, अशी मागणी यावेळी निवदेनाद्वारे करण्यात आली. जिल्हाप्रमुख रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या द्वारावर सकाळी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ढोल बडवून प्रशासनाचे लक्ष वेधले. साडेअकरा वाजेपासून महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनाच्या द्वारावर कार्यकर्ते जमले व त्यांच्यापैकी काहींनी ढोल वाजविण्यास सुरुवात केली. सुमारे तासभर ढोल बजाओ आंदोलन सुरू होते. यानंतर पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. (प्रतिनिधी)
पालिकेच्या द्वारावर बडविले ढोल
By admin | Published: January 24, 2017 12:27 AM