लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : बजेट हे कधीही धर्मावर आधारित होऊ शकत नाही. ते कोणत्याही जाती-धर्माचे नसते. जाती-धर्माचा विचार करून देश चालत नाही, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गुरुवारी पत्र परिषदेत सांगितले.
पंतप्रधान मोदी यांनी पिंपळगाव बसवंत येथील सभेत याबाबतचे सुतोवाच केले होते. त्याकडे लक्ष वेधल्यावर पवार यांनी हा चिमटा काढला. सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करताना कांद्यावर बोला असे म्हणत जोरदार घोषणाबाजी करणाऱ्या किरण सानप या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. सानप हा शरद पवार गटाचा आयटी सेलचा पदाधिकारी असल्याची चर्चा होती. त्यावर बोलताना ‘तो युवक माझ्या पक्षाचा आहे का, ते माहिती नसून असेल तर त्याचा मला अभिमान आहे. या भागातील कांद्याचा प्रश्न ज्वलंत असल्याचेच त्याने दाखवून दिले’ असे पवार म्हणाले. पंतप्रधान या भागात येऊन शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नाला स्पर्श करीत नसतील तर तसे घडणे स्वाभाविक आहे, असेही ते म्हणाले.