भगूर : परिसरातील शेतीमळे व राहुरीगावाच्या आसपास हिंसक बिबट्याने गेल्या काही महिन्यांपासून धुमाकूळ घातला असून, बुधवारी पहाटे राहुरी शिवारात जनावरांच्या गोठ्यावर हल्ला चढवून बिबट्याने दुभत्या म्हशीचा फडशा पाडला आहे. बिबट्याच्या दिवस-रात्र दर्शनाने दारणा काठावरील शेतकरी भयभीत झाले असून, बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, अशी मागणी केली जात आहे.भगूर, राहुरी, दोनवाडे शिवारातून दारणा नदी खळाळून वाहत असल्यामुळे दुतर्फा शेतीमळे वाढले आहेत. त्याचबरोबर या भागात घनदाट जंगल पसरले आहे. त्यामुळे या भागात इगतपुरी, कसारा आदी भागातून बिबटे भक्ष्य शोधण्यासाठी दारणाकाठी येत असतात. शेतमळे व जंगलामुळे त्यांना लपण्यासाठी पुरेशी जागा असून, शेतकऱ्यांची जनावरे त्यांचे भक्ष्य ठरू लागले आहेत. त्यामुळे एकाहून अधिक बिबटे या ठिकाणी वास्तव्यास असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. त्यातूनच बुधवारी पहाटे चार वाजता राहुरी शिवारातील सुकदेव आव्हाड यांच्या गट नं. २०४ मध्ये बिबट्याने गोठ्यात शिरून जनावरांवर हल्ला चढविला यात गणेश सुभाष भुजबळ याची म्हैस जागीच ठार झाली. अन्य जनावरांनी आरडाओरड केल्यामुळे बिबट्याने या ठिकाणाहून पळ काढला. चार महिन्यांपूर्वीदेखील बिबट्याने या भागात दोन गायींचे पारडू व एक गोºहा अशाच प्रकारे हल्ला चढवून ठार केले असून, या भागातील शेतकºयांचे श्वानदेखील बिबट्याने फस्त केल्याने नागरिकांना भीती वाटू लागली असल्याची तक्रार गणेश भुजबळ यांनी केली तसेच बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या म्हशीची नुकसानभरपाई मिळावी यासाठी वनरक्षकांना निवेदन दिले. या घटनेनंतर वनाधिकारी मधुकर गोसावी यांनी पाहणी करून पंचनामा केला.त्यामुळे या भागातील नागरिक दहशतीखाली वावरत आहेत. वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सुकदेव आव्हाड, अर्जुन कापसे, काळू आवारे, योगेश आव्हाड, सुभाष वाघ, उत्तम पानसरे, राजाभाऊ सोनवणे, नरेश गायकवाड आदी शेतकºयांनी केली आहे.वावर वाढलाभगूरची स्मशानभूमी, आठवडे बाजार, दारणा नदीकिनारी तसेच रामदास सोनवणे यांच्या बंगल्याच्या परिसरात दररोज रात्री बिबट्या फिरत असून, त्याने अनेक श्वानांचा फडशा पाडला आहे.वनविभागाने बिबटे पकडल्यावर ते कसारा घाटातील जंगलात सोडले जातात आणि हेच बिबटे भक्ष्य, पाण्याच्या शोधात इगतपुरीसह देवळाली एअरफोर्स जंगल, दारणा नदीच्या काठावरील मानवी वस्तीच्या शेतमळ्यात वास्तव्य करीत आहेत. त्यामुळे त्यांना जेरबंद करूनही ते पुन्हा पुन्हा परतत आहेत.- निखिल भालेराव
बिबट्याकडून म्हशीचा फडशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:31 AM