देवळा, चांदवड, निफाड या नगरपंचायती भाजपच्या ताब्यात तर पेठ, सुरगाण्यावर माकपाने वर्चस्व प्रस्थापित केले. दिंडोरी व कळवणला राष्ट्रवादीने झेंडा रोवला. मात्र आता या नगरपंचायतींची मुदत सन २०२० मध्येच संपुष्टात आली असून, कोरोनामुळे सरकारने या नगरपंचायतींना मुदतवाढ न देता त्यावर प्रशासकांची नेमणूक केली आहे. हाच प्रकार नगरपालिकांच्या बाबत आहे. जिल्ह्यातील बागलाण, सिन्नर, मनमाड, नांदगाव, भगूर, येवला, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या नगरपालिकांच्याही निवडणुका याचदरम्यान घेतल्या गेल्या. त्यापैकी त्र्यंबक, इगतपुरी वगळता सर्वच नगरपालिकांची मुदत संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबरोबरच या निवडणुकांचाही बार उडणार असल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे.
डिसेंबर २१ ते फेब्रुवारी २२ पर्यंत मुदत संपणाऱ्या सर्वच नगरपंचायती व नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी प्रभागरचना निश्चित करण्याच्या कामात आयोगाने लक्ष घातले असून, सोमवारपासून (दि. २३) प्रभागरचनेचे काम हाती घेण्याच्या सूचना केल्या आहेत. अर्थात, प्रभाग एक सदस्यीय असेल की द्विसदस्यीय याबाबत आयोगाने स्पष्ट केलेले नाही. मात्र सध्याचे प्रभाग व सन २०११ ची जनगणना लक्षात घेता प्रभागाची रचना निश्चित करण्यास सांगितले आहे. त्यात लोकसंख्या, वाढलेली हद्द, नवीन वसाहती, चौक, पूल, नदी अशा लॅण्डमार्कच्या खुणा लक्षात घेण्याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. प्रभागरचना निश्चित झाल्यावर ती आयोगाला थेट पाठविण्याची व प्रसिद्धी न करण्याच्या सक्त ताकीदही देण्यात आली आहे.
चौकट====
प्रभागरचनेनंतरच आरक्षण
प्रभागरचनेनंतरच नगरपंचायती, नगरपालिकांचे आरक्षण जाहीर करण्यात येणार असली तरी, गेल्यावेळचे आरक्षण व संभाव्य आरक्षण लक्षात घेऊन इच्छुकांनी या निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी चालविली आहे. गेल्या काही महिन्यांपासून इच्छुकांकडून सुरक्षित प्रभागाचा शोधही घेतला जात आहे.
चौकट==
ओझरला होणार निवडणूक
सहा महिन्यांपूर्वी निफाड तालुक्यातील ओझर ग्रामपंचायतीचेही नगरपंचायतीत रूपांतर करण्यात आले असून, सध्या येथे प्रशासकाची नेमणूक आहे. गेल्यावर्षीच ओझर ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती; परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्यात आल्याने आपोआपच ग्रामपंचायत सदस्यांना घरी बसावे लागले आहे. आयोगाच्या सूचना पाहता आता ओझर नगरपंचायतीची निवडणूक होण्याची शक्यता बळावली आहे.