नाशिकमध्ये शासकीय विश्राामगृह येथे गुरूवारी (दि.२९) झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी पुरापासून संरक्षणासाठी नद्यांना भिंत घालणे हा उपाय होऊ शकत नाही. कोसी नदीवर १९५२ पासून असे अनेक बांध बांधण्यात आले परंतु पूर थांबलेला नाही असे सांगून ते म्हणाले की, जगातील शंभर मोठ्या नद्या तरी मी बघितल्या आहेत. अशा अनेक ठिकाणी बांधलेल्या भिंती किंवा तत्सम बांधकामे पाडावी लागली आहेत. त्यामुळे आधी बांधणे आणि नंतर तोडणे असे दुहेरी खर्च झाले आहे.
मुळात नदीकाठी असलेले क्षेत्र हे ब्लू झोन, रेड झोन हे नदीपात्र संरक्षित राहावे यासाठी तयार केले जाते, तेथे भिंत कशी बांधणार असा प्रश्न त्यांनी केला. अहमदाबाद येथे गुजरात सरकारने साबरमतीला केलेले बांधकाम अयोग्य असून नदीबाबत लालच असणारेच असे करू शकतात, असेही ते म्हणाले. नद्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी रिवर आणि सिवर (नद्या आणि गटारी) वेगवेगळ्या ठेवल्या पाहिजेत असा सल्ला शेवटी त्यांनी दिला.
इन्फो..
१११ नद्यांचे राष्ट्रगान तयार करणार
नाशिकमध्ये गोदावरी नदीचे राष्ट्रगान तयार करण्यात आले असून त्याचे नुकतेच लोकार्पण झाले आहे. अशाच प्रकारे १११ नद्यांचे राष्ट्रगान तयार करण्यात येणार आहे, हे राष्ट्रगान शाळाशाळांमध्ये विद्यार्थ्यांनी म्हटल्यास नद्यांचे महत्व आणि अस्मिता जागृत होईल असेही राजेंद्रसिंह म्हणाले.
इन्फो...
नमामि गंगा ही कार्पोरेट डेमोक्रसी
केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येेत असलेल्या नमामि गंगा यावर टीका करताना राजेंद्रसिंह म्हणाले, पब्लिक डेमोक्रसी संपवून कार्पोरेट डेमोक्रसी अशी ही परियोजना आहे. केवळ घाट बांधल्याने नदी शुद्ध आणि संरक्षित होत नाही. नदीची जखम हृदयाला असेल तर तेथेच उपचार केले पाहिजे. भलत्या ठिकाणी उपचार करून नदी जीवंत राहू शकणार नाही असेही ते म्हणाले.