मुरंबी येथील जिल्हा परिषद शाळेची भिस्त एकाच शिक्षकांवर अवलंबून असल्याच्या तक्रारी वर्षानुवर्षे केल्या जात आहेत. येथे दोन शिक्षकांची पदे मंजूर असून, एका शिक्षिकेला जि.प.च्या शिक्षण विभागानेच डाएटवर (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था) नाशिक पाठविले असून, त्या तेथेच काम करत आहेत, तर अवघ्या एकाच शिक्षकावर पाच वर्गांच्या शाळेची जबाबदारी सोपविण्यात आल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. येथे जेवढी मंजूर पदे आहेत, तेवढेच शिक्षक पाठवावेत, अन्यथा गावकऱ्यांनी आमरण उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे. मुरंबी (ता.त्र्यंबकेश्वर) येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग असून, सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात पटसंख्या ३५ आहे. येथील शाळा द्विशिक्षकी असून, येथील कार्यरत असलेल्या एक शिक्षिका २५ जून, २०१९ पासून शाळेत अद्याप हजर झालेल्या नाहीत, असे ग्रामस्थांनी सांगितले. त्र्यंबकेश्वरच्या गटशिक्षण विभागात चौकशी केली असता, गटशिक्षणाधिकारी राजेंद्र शिरसाट व शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष भालेराव यांनी मुरंबीच्या शिक्षिका श्रीमती उशीर यांना जि.प.च्याच शिक्षण विभागाने जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था येथे पाठविले आहे व सध्या मुरंबीच्या पाच वर्गांचा कार्यभार एकच शिक्षक सांभाळत असल्याचे मान्य केले.
त्र्यंबकेश्वरमधील मुरंबी शाळेचा भार एकाच शिक्षकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 7:10 PM
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील मुरंबी येथील जि.प.शाळा इमारतीमधील इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या वर्गांची जबाबदारी अवघा एकच शिक्षक सांभाळत असून, हा एकखांबी तंबू सांभाळताना सदर शिक्षकाची कसरत होताना दिसून येत आहे.
ठळक मुद्दे विद्यार्थ्यांचे नुकसान : ग्रामस्थांनी दिला उपोषणाचा इशारा