नाशिक : राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी व बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु, हे काम करणाऱ्या शिक्षकांवर यावर्षी शिक्षण मंडळाकडून कार्यभार वाढविण्यात आला असून, हे वाढीव काम शिक्षकांना दिलेल्या निर्धारित वेळेतच पूर्ण करावे लागणार असल्याने शिक्षकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी पेपर तपासणीच्या कामावर टाकलेल्या बहिष्कारामुळे प्रारंभी बारावीच्या पेपर तपासणीचे काम उशिरा सुरू झाले असून, या शिक्षकांसमोर वेळेत काम पूर्ण करण्याचे आव्हान आहे. त्यातच नियमित निवृत्त होणारे शिक्षक व रखडलेली शिक्षक भरतीप्रक्रिया यामुळे तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांची कमतरता जाणवत असल्याने उपलब्ध शिक्षकांवर पेपर तपासण्याचा कार्यभार वाढविण्यात आला आहे. तर दहावीच्या परीक्षा संपल्यानंतर शिक्षकांचे पेपर तपासण्याचे काम सुरू असले तरी दरवर्षाच्या तुलनेत यावर्षी तपासण्यासाठी मिळालेल्या पेपरची संख्या जवळपास दीडपट ते दुप्पट असल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.शिवाय शिक्षण मंडळाने शिक्षकांना तीनशे ते चारशे पेपर तपासण्याचे काम १० ते १२ दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना के ल्याने शिक्षकांवरील कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे संतप्त शिक्षकांकडून काम उरकण्याच्या घाईत विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास करून दिलेल्या परीक्षेच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता एका शिक्षकाने वर्तवली आहे.पेपर तपासण्याचे काम जबाबदारीचे असल्याने अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ज्येष्ठ शिक्षकांची निवृत्ती आणि विविध जबाबदाऱ्यांमुळे तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांवर काही प्रमाणात पेपर तपासणीचा कार्यभार वाढण्याची शक्यता आहे. यात विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊनच जबाबदार शिक्षकांकडे ही कामगिरी सोपविण्यात आली आहे.- के. बी. पाटील, विभागीय अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक
पेपर तपासणीचा दुप्पट बोजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 12:51 AM