पंचवटी : मखमलाबादरोडवरील मंडलिक मळ्याजवळ अज्ञात चोरट्यांनी एका बंद सदनिकेचे कडीकोयंडा तोडून घरफोडी केल्याची घटना घडली आहे. या घटनेत चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व अंदाजे सव्वा लाख रुपयांची रोकड, असा सुमारे पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरला आहे. या प्रकरणी गुरुवारी (दि.२८) सकाळी पंचवटी पोलीस ठाण्यात सुजीत प्रभाकर खांदवे यांनी तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी अज्ञातांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, मखमलाबादरोडवरील शिवनेरी प्राइड इमारतीत राहणाऱ्या सुजित प्रभाकर खांदवे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. खांदवे हे शेतकरी असून, गेल्या मंगळवारपासून दिंडोरी तालुक्यातील पिंपळनारे येथे शेतावर गेले होते. याच कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेले सुमारे सहा तोळे सोन्या-चांदीचे दागिने आणि सव्वा लाख रुपयांची रोकड असा सुमारे पावणेतीन लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. याच इमारतीत राहणाऱ्या एका सदस्याला गुरुवारी सकाळी खांदवे यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसल्यामुळे त्यांनी खांदवे यांना या प्रकाराची माहिती दिली. त्यामुळे खांदवे घरी आले. यावेळी घरातील सोने-चांदीचे दागिने तसेच सव्वा लाख रुपयांची रोकड चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीची तक्रार दाखल केली. खांदवे यांना बागेचे पैसे मिळाले होते. दोन-तीन दिवसांपूर्वी रंगपंचमी असल्याने बँक बंद होती म्हणून त्यांनी रोकड घरी ठेवली होती.
मखमलाबादरोड भागात घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 1:02 AM