नाशिक : चुंचाळे शिवारात चाेरी आणि घरफाेडी करून गेल्या सहा वर्षांपासून पाेलिसांच्या हातावर तुरी देणाऱ्या मोहम्मद आरिफ सरोजउद्दीन खान (वय ३८, रा. ब्लाॅक नंबर ३, उल्हासनगर, जि. ठाणे) या सराईत दराेडेखाेराला मध्यवर्ती गुन्हे शाखेने ठाण्यातून अटक केली आहे. मात्र, पोलिसांना मोहम्मदच्या मुसक्या आवळण्यात यश आले असले तरी या गुन्ह्यातील तीन आरोपी अजूनही फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चुंचाळे शिवारात २०१५ मध्ये घरकुल योजनेच्या बांधकामावरील साठ हजारांच्या ॲल्युमिनियमच्या प्लेट सराईत चाेर मोहम्मद खान याने व त्याच्या तीन साथीदारांनी घरफोडी करून चोरल्याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, तो सध्या उल्हासनगर येथे असल्याची माहिती पोलीस शिपाई सचिन आजबे यांना मिळाली हाेती. त्यानुसार पोलीस निरीक्षक अंचल मुजगल, कुंदन जाधव, उपनिरीक्षक माणिक गायकर व मध्यवर्ती गुन्हे शाखेकडील हवालदार श्रीराम सपकाळ, पोलीस नाईक संदीप पवार, संजय गामणे, अनिल शिंदे यांच्या पथकाने चाेरीच्या गुन्ह्यात तब्बल सहा वर्षांपासून फरार मोहम्मद खान याला उल्हासनगर येथून ताब्यात घेतले. तसेच त्याला पुढील कारवाईसाठी अंबड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. खानविरुद्ध नाशिक, मुंबई, ठाणे भागात दराेड्याचे व अन्य गंभीर गुन्हेही दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.