भाक्षी रोडलगतच्या फुलेनगरमधील खंडेराव महाराज मंदिराजवळ राहत असलेल्या वत्सलाबाई देवरे कामानिमित्त नाशिक येथे गेल्या असता घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी चोरी केली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
रविवारी वत्सलाबाई यांच्या घराचा दरवाजा अर्धवट उघडा असल्याचे शेजारच्यांच्या निदर्शनास आले. याची माहिती वत्सलाबाई यांचा मुलगा संतोष देवरे यांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ घरी येऊन बघितले असता घराचे कुलूप तोडलेले होते. घरातील लाकडी कपाट तोडून आतील सामान अस्ताव्यस्त असल्याचे आढळून आले. संतोष यांनी भाऊ हेमंत देवरे यांना सदरचा प्रकार कळवून आईला देखील भ्रमणध्वनीद्वारे याबाबत माहिती दिली.
वत्सलाबाई देवरे रात्री १० वाजता सटाणा येथे पोहचल्या असता कपाटातील सोन्याचे गाठले, नथ, ओम पान, चांदीचे कडे, वाळे, सोनसाखळ्या अशा एकूण सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दोन लाख पन्नास हजारांची रोख रक्कम असा चार लाख ७७ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला असल्याचे निदर्शनास आले.
संतोष देवरे यांनी सटाणा पोलिसात तक्रार दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत.
इन्फो...
गस्त वाढविण्याची मागणी
सटाणा शहरात चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. भाक्षी रोड परिसरात नेहमीच चोऱ्या होत असल्याने पोलिसांपुढे चोऱ्यांचा तपास करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. भाक्षी रोड परिसर भाक्षी ग्रामपंचायत हद्दीत येत असल्याने येथे दाट वस्ती आहे. पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख लालचंद सोनवणे यांनी केली आहे.
===Photopath===
090221\09nsk_18_09022021_13.jpg
===Caption===
सटाण्यात घरफोडी