सिन्नर : शहरातील खर्जेमळ्यात राजयोग कॉम्प्लेक्स या इमारतीत अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करीत सोन्या-चांदीचे दागिने मिळून दीड लाखाचा ऐवज लांबविल्याची घटना बुधवारी (दि.६) सकाळी ११ ते दुपारी २ वाजेच्या दरम्यान घडली.
खर्जेमळा परिसरात असलेल्या राजयोग कॉम्प्लेक्समध्ये भारत नाना थोरात हे कुटुंबीयांसह वास्तव्यास असून ते रंगकाम तर पत्नी खासगी एजन्सीमध्ये काम करून उदरनिर्वाह करतात. काल सकाळी थोरात हे रंगकाम करण्यासाठी धारणगाव येथे गेले तर पत्नीही फ्लॅटला कुलूप लावून गेली होती. सकाळी ११ ते दुपारी २ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी थोरात यांच्या फ्लॅटच्या दरवाजाला लावलेले कुलूप व कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे कर्णफुले २, लहान मुलींची नथ २, ओम पान ३, कानातील बाळी २ जोड, १ सोन्याची अंगठी, दोन भाराची चांदीची चैन, ३ जोड जोडवे, १ ज्योती, लहान-मोठे ६ जोड पैंजण, हातातील कडे २ जोड असा १ लाख ५० हजारांचा ऐवज घेऊन पोबारा केला.
धारणगाव येथे रंगकामासाठी गेलेले थोरात हे लवकर काम आटोपल्याने दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घरी परतले असता त्यांना फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप व कडीकोयंडा तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. थोरात यांनी घरात जाऊन पाहिले असता कपाटातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. थोरात यांनी लागलीच सिन्नर पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
इन्फो...
त्या इमारतीत दोन पोलीस अधिकारी वास्तव्यास
घरफोडी झालेल्या राजयोग इमारतीमध्ये सिन्नर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले दोन पोलीस अधिकारी देखील वास्तव्यास आहे. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर तसेच अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या तसेच दोन कर्तव्यदक्ष पोलिसांचा रहिवास असलेल्या या इमारतीत अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.