याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकातील कर्मचाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या नेतृत्वाखाली सीबीएस परिसरात पोलिसांनी सापळा रचला. तेथे एक संशयित युवक आला असता त्याच्या हालचालींवरून पोलिसांना तो घरफोडीतील चोरटा असल्याचा संशय बळावला. मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी वर्णनाची पडताळणी करत खात्री पटवून त्या संशयितास शिताफीने ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने सुरेश विष्णू गुरुकुले (२०,रा.हिवरे गाव, ता.सिन्नर) अशी स्वत:ची ओळख सांगितली. त्याची अंगझडती घेतली असता पोलिसाना त्याने घातलेल्या पॅन्टच्या खिशातून चांदीच्या मुकुटाचे ११ तुकडे आढळून आले. पथकाने त्यास पोलिसी खाक्या दाखविताच त्याने इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील चेतनानगर परिसरात एका बंद घराचे कुलूप तोडून डिसेंबर महिन्यात घरफोडी केल्याची कबुली दिली. सुरेशला पोलिसांनी अधिक विश्वासात घेत शहरात अशाप्रकारे अजून कोठे घरफोड्या केल्या? तसेच तुझे शहरात अजून कोण साथीदार आहेत? अशी माहिती विचारली असता त्याने संशयित करीम महंमद शेख (३२,रा.इंदिरानगर) असे दुसऱ्या साथीदाराचे नाव सांगितले. पोलिसांनी त्याचा राहत्या घराच्या परिसरात शोध घेतला असता करीम हाती लागला नाही. सुरेश याने करीमच्या मदतीने शिंगाडा तलाव येथील दुकानातून ऑक्सिजन सिलिंडर चोरी केल्याची कबुली दिली. करीमचा टेम्पो व गुन्ह्यातील मुद्देमाल लेखानगर येथे दडवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यास लेखानगर येथे घेऊन जात धाड टाकून ५० हजार रुपये किमतीचा थ्री व्हीलर टेम्पो, चौदा हजारांचे सिलिंडर, लोखंडी कटावण्या जप्त केल्या. या कारवाईत एकूण ७३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे. सुरेश यास पुढील कारवाईसाठी इंदिरानगर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. त्याचा दुसरा साथीदार करीम याचा पोलीस शोध घेत आहेत.?
घरफोडीतील संशयितास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 4:15 AM