मंदार प्रभाकर वडगावकर यांचे मामा कीर्तिकुमार शंकर औरंगाबादकर यांच्या या वाड्यातील सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू, साठ हजारांची रोकड, गॅस सिलिंडर, असा एकूण ९ लाख ८१ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याचे उघडकीस आले होते. वाड्याच्या वरच्या मजल्यावरील छताचे पत्रे उचकटून आतमध्ये चोरट्यांनी प्रवेश केल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले होते. वडगावकर यांच्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना भद्रकाली व पंचवटी पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी निखिल संजय पवार याने त्याच्या साथीदारासह घरफोडी केल्याचे समजले. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी संशयित निखिल संजय पवार (२०, त्रिकोणी बंगला, हिरावाडी), योगेश चंद्रकांत साळी (२०, लेखानगर, सिडको) यांना बेड्या ठोकल्या, तसेच संशयितांच्या अल्पवयीन दोन साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. संशयितांकडून सात तोळे सोने, पावणेपाच किलो चांदी, तांबे व पितळीची भांडी, प्लंबिंगचे साहित्य व रोख रक्कम, असा सुमारे ५ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
---इन्फो---
चोरीचे दागिने घेणारेही ताब्यात
घरफोडी, चोरी केलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांपैकी काही दागिने हे संशयित चोरट्यांनी राजेंद्र किसन अहिरराव, यशवंत ऊर्फ दौलत शंकर सोनवणे व अमोल किसन राजधर यांना विक्री केल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या तिघा संशयितांना जुन्या नाशकातील म्हसरूळटेक, डिंगरअळी, हुंडीवाला लेन परिसरातून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी करून त्यांनी खरेदी केलेले १ लाख ९६ हजार रुपये किमतीचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहे. त्यांच्याविरुद्धही चोरीचे दागिने घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.