नांदूरवैद्य : धामणगाव येथील दिड एकर ऊस शेतातील विद्युत तारांच्या शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाल्याची घटना बुधवारी (दि.२३) रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली . यामुळे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.धामणगाव परिसरात काही दिवसांपूर्वीच विठ्ठल उगले, अशोक गाढवे, रामदास गाढवे, राजाराम गाढवे या शेतकऱ्यांचा विजेच्या लोंबकळत असलेल्या विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांमुळे शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत पाच एकर ऊस जळून खाक झाले. ही घटना ताजी असतांना पुन्हा कैलास गाढवे यांच्या जवळपास दिड एकर संपूर्ण तोडीस आलेला ऊस विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून भस्मसात झाल्याची घटना घडली. धामणगाव परिसरात अति जिर्ण झालेले वीजेचे खांब अनेक वर्षांपासून मागणी केली असतांना देखील संबंधित विभागाने बदलले नसल्यामुळे या घटना घडत असून यास संबंधित वीज वितरण कंपनी जबाबदार असून झालेल्या नुकसानीची भरपाई संबंधित विभागाने शेतकऱ्याना देऊन दिलासा देण्यात यावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात येथील शेतकरी यांनी वीज वितरणचे सहाय्यक अभियंता श्री.धोरणकर, तलाठी सैयद कृषीसहाय्यक श्रीमती शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही एकञित पंचनामा करुन संबधित शेतकऱ्यांना मदत मिळवुन देण्याचा प्रयत्न करु असे यावेळी सांगण्यात आले. याप्रसंगी सरपंच शिवाजी गाढवे, विलास गाढवे, सागर गाढवे, तानाजी गाढवे, विठ्ठल गाढवे, सोमनाथ बरतड उपस्थित होते.
शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दिड एकर ऊस जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 1:35 PM