पंचवटी : काट्या मारुती पोलीस चौकीच्या हद्दीतील गुरुद्वाराशेजारी असलेल्या एका सदनिकेच्या वाहनतळामध्ये उभ्या असलेल्या दुचाकीना आग लागून पाच दुचाकी जळाल्याची घटना बुधवारी (दि.२२) रात्री साडेअकरा वाजता घडली. सुदैवाने आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र, दुचाकी जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
घटनेचे वृत्त कळताच पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ धाव घेत आग आटोक्यात आणली. सदर आग कशाने लागली याचे कारण लागलीच समजू शकले नाही.
मात्र, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे बोलले जात आहे.
बुधवारी रात्री गुरुद्वाराजवळ असलेल्या सीमा अपार्टमेंटच्या वाहनतळावर सदस्यांनी नेहमीप्रमाणे दुचाकी उभ्या केलेल्या होत्या. रात्री साडेअकरा वाजता सदनिकेच्या आवारात धूर निघून काही तरी जळाल्याचा वास येऊ लागल्याने सदस्यांनी तत्काळ खाली धाव घेतली. त्यावेळी दुचाकी पेटलेल्या दिसल्या. नागरिकांनी तत्काळ पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुचाकीनी वेगाने पेट घेतल्याने पंचवटी अग्निशमन दलाला माहिती
कळविली. त्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान पाण्याच्या बंबासह दाखल झाले. इमारतीच्या वाहनतळात
मोठा भडका उडाल्याने त्यांनी सुरुवातीला सदनिकेत राहणाऱ्या नागरिकांना बाहेर काढले आणि त्यानंतर पेटलेल्या दुचाकीवर पाण्याचा मारा करून दुचाकीना लागलेली आग आटोक्यात आणली. या घटनेत पाचही दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
सदरची आग शॉर्टसर्किटमुळे लागली की कोणी लावली, याबाबत शंका आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.