नाशिक : केंद्रीय अवजड उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या कथित वादग्रस्त विधानावरून चिघळलेल्या वादात शिवसेना कार्यालयावर चालून आलेल्या भाजपा कार्यकर्त्यांचा हल्ला परतवून लावल्यानंतर शिवसैनिकांनी शालीमार येथील शिवसेनेच्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती कार्यालयासमोर नारायण राणे व भाजपाविरोधात घोषणाबाजी करीत जोरदार निदर्शने केली. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी नारायण राणे यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून त्यांच्याविरोधात निषेध व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मंगळवारी (दि. २४) तुंबळ दगडफेक झाली. या घटनेमुळे शालीमार येथील शिवसेना कार्यलयाबाहेर जमलेल्या पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दगडफेकीच्या घटनेनंतर शिवसेना कार्यालयावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच संपूर्ण शहरातून शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी कार्यालयासमोर पोहोचले. यावेळी युवा सेना व विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांसह शिवसैनिकांनी भाजपाविरोधात व नारायण राणे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने करून नारायण राणेंविरोधात निषेध व्यक्त केला. यावेळी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह, महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या युवासेना व विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
इन्फो-
तणावामुळे दुकानांचे शटर डाऊन
भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उफाळून आलेल्या हिंसाचारामुळे महात्मा फुले कलादालन व शालिमार परिसरातील दुकानदारांनी तत्काळ त्यांच्या दुकानांचे शटर डाऊन करीत सर्व दुकाने बंद केली. मात्र दुपारनंतर परिस्थिती काही प्रमाणात सावरल्याने ही दुकाने पुन्हा उघडण्यात आली.