नाशिकरोड : नेहरूनगर येथील सीआयएसएफ वसाहतीत अज्ञात समाजकंटकाने सीआयएसएफच्या दोन जवानांच्या दुचाकी सोमवारी पहाटे पेटवून दिल्याने त्या आगीत जळून खाक झाल्या. सीआयएसएफ वसाहतीत गेल्या काही महिन्यांत तिसऱ्यांदा वाहन जळीतकांडाची घटना घडल्याने सीआयएसएफ वसाहतीच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे.नेहरूनगर सीआयएएफ वसाहतीतील टाइप -२ ए क्वार्टरमध्ये जवान संदीप विश्रांत पानवळ (३९) व मंगल आनंदराव पाटील हे राहण्यास असून, त्यांच्या दुचाकी इमारतीखाली नेहमीप्रमाणे लावल्या होत्या. सोमवारी (११ मार्च) पहाटे ४ वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकाने पानवड यांची ड्रीम युगा (एमएच ५० जी ०४८५) व पाटील यांची होंडा शाईन (सीजी ०७ एलडब्ल्यू ०१८९) या दोन्ही दुचाकीवर काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून देण्यात आल्या. काही वेळातच आजूबाजूच्या रहिवाशांना दुचाकींना आग लागल्याचे निदर्शनास येताच सर्वांनी घटनास्थळी धाव घेऊन दुचाकीला लागलेली आग विझवली. मात्र तोपर्यंत दोन्ही गाड्या आगीत जळून खाक झाल्या होत्या.वाहन जळीताची तिसरी घटनानेहरूनगर सीआयएसएफच्या नियंत्रण कक्ष मोटार परिवहन विभागात गेल्या १२ आॅक्टोबर २०१८ रोजी अचानक लागलेल्या आगीत सीआयएसएफच्या क्वॉलिस व मार्शल जीपचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर गेल्या २ जानेवारी २०१९ रोजी पहाटे सीआयएसएफच्या वसाहतीत दोन-तीन ठिकाणी नऊ दुचाकींवर ज्वलनशील पदार्थ टाकून त्या पेटवून देण्यात आल्या होत्या. या दोन्ही घटनेचा अद्याप उलगडा झालेला नाही.दुचाकीला लागलेल्या आगीच्या ज्वालांमुळे इमारतीच्या तळ मजल्यावरील वीजमीटरदेखील जळाले आहेत. याबाबत सीआयएसएफ जवान संदीप पानवळ यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेहरूनगर वसाहतीत वाहन जळीतकांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 1:16 AM