देवळा (नाशिक): कळवण आगाराची बस आणि रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातानंतर दोन्ही वाहनं विहिरीत कोसळली. यामध्ये 21 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त बस कळवण आगाराची होती. बस आणि रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक झाल्यानंतर दोन्ही वाहनं विहिरीत कोसळली. कळवण आगाराची बस आणि रिक्षा यांची मेशी फाट्याजवळील वळण रस्त्यावर समोरासमोर धडक झाली. एसटी बस कळवणच्या दिशेनं, तर रिक्षा मालेगावच्या दिशेनं जात असताना हा अपघात झाला. दोन्ही वाहनांच्या चालकांना वेग नियंत्रणात अपयश आल्यानं ही दुर्घटना घडली. या धडकेनंतर बसनं रिक्षाला फरफटत नेलं. यानंतर दोन्ही वाहनं विहिरीत पडली. विहिरीत रिक्षावर बस पडल्यानं रिक्षामधील सात ते आठ प्रवाशांचा प्रवास मृत्यू झाल्याचं समजतं. याशिवाय बसमधील काही प्रवाशांवरदेखील काळानं घाला घातला आहे. यामध्ये चालकाचादेखील समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा शल्य चिकित्सक तातडीनं घटनास्थळी रवाना झाले. नाशिकहून जिल्हा रुग्णालयाच्या पाच गाड्या रवाना करण्यात आल्या. विहिरीत पडलेली बस काढण्यात प्रशासनाला यश आलं आहे. मात्र अद्याप दोन जण बेपत्ता आहेत. सध्या शोधकार्य थांबवण्यात आलं आहे. थोड्याच वेळात ते पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. एसटी बसचा टायर फुटल्यानं हा अपघात झाल्याची चर्चा आहे. मात्र एसटी प्रशासनाकडून याबद्दलची माहिती देण्यात येईल, असं घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावं-१. अलका धोंडीराम मोरे (खर्डी)२. चंद्रभागा मांगू अुगले (सटवाईवाडी)३. कृष्णाजी संपत निकम (वारवारवाडी)४. रिद्धी योगेश वनसे (जिंबायती)५. शिवाजी रुपल गावीत (नाळीद, कळवण)६. अन्सार अब्दुल अहमद मन्सुरी (सटाणा)७. अंजना शिवराम झाडे (दोडी)८. बाळासाहेब निकम (शिरसमणी)९. शाहिस्ता शकील मन्सुरी (नांदगाव)१०. प्रकाश बच्छाव, चालक (भेंडी)११. रघुनाथ पांडुरुंग मेतकर (देवळा)१२. अजिज नथ्थू मन्सुरी (येसगाव)
---