- संदीप बत्तासे नाशिक - मध्य प्रदेशातील शहाडौल येथून यात्रेकरूंना घेऊन निघालेल्या खासगी बसला झालेल्या अपघातामध्ये एक महिला जागीच ठार झाली असून २३ प्रसासी जखमी झाले आहेत. हा अपघात मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास झाला.
मध्य प्रदेशातील यात्रेकरूंना घेऊन खासगी बस (क्रमांक एमपी १७झेड ४४३७) त्र्यंबकेश्वरहून द्वारका येथे जाण्यास निघाली. रात्री एक वाजेच्या सुमारास,तोरंगण-खरपडी घाटात, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने व तीव्र उतार असलेल्या वळणाचा अंदाज न आल्याने अपघात झाला. या भीषण अपघातात सुखीबाई सिंग राठोड (६२) या गंभीर जखमी झाल्याने जागीच मयत झाल्या. बसमधील ४५ प्रवाशांपैकी २३ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना हरसूल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
मध्य प्रदेशातील शहाडौल जिल्ह्यातील ४५ भाविक देवदर्शन करण्यासाठी ३ जानेवारी रोजी निघाले होते.८ फेब्रुवारीला ते आपल्या गावी पोहोचणार होते.शनिवारी त्यांनी त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले व ते गुजरातच्या द्वारका येथे जाण्यासाठी निघाले. तोरंगण-खरपडी घाटातील तीव्र ऊतारावर चालकाचे बसवरील नियंत्रण गेले व दोन पलटी खाऊन,बस रस्त्याच्या कडेला कोसळली.
हा अपघात मध्यरात्री एकच्या सुमारास झाल्याने व आजुबाजूला जंगल असल्याने अर्धा तास या बसमधील प्रवासी मदतीची याचना करीत ओरडत होते. त्यानंतर तोरंगण,खरपडी ग्रामस्थ व हरसुल पोलीस स्टेशनचे चेतन लोखंडे,मोहित मोरे, पोलीस हवालदार देवदत्त गाडर व कर्मचाऱ्यांरी व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिस उपनिरीक्षक मोहित मोरे व पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या खाजगी वाहनाद्वारे अनेक जखमी यात्रेकरूंना रुग्णालयात पोहोचविले. दोन जेसीबीच्या साह्याने पलटी झालेली बस सरळ केली.त्यानंतर अडकलेल्या प्रवाशांना बसमधून बाहेर काढले. जखमी प्रवाशांना त्वरित हरसुल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.