नाशिक - बोरगाव कनाशी मार्गावरील गायदरी घाटात बुधवारी (2 मे) पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास एका खासगी ट्रॅव्हल बस भीषण अपघात झाला. कळवण (नाशिक) सापुतारापासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या गायदरी घाटात ही बस कोसळली. यामध्ये तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झालेत. मृतांमध्ये 2 महिला आणि एका 8 वर्षांच्या मुलीचा समावेश असून त्यांची ओळख अद्यापपर्यंत समजू शकलेली नाही. तर जखमींमध्ये लहान मुले आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बसमधील प्रवासी हे गुजरातमधील नवसारी आणि सुरतचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. वणी येथील सप्तश्रृंगीगडावरील देवीच्या दर्शनासाठी ते सुरतहून महाराष्ट्रात येत असतानाच हा अपघात घडला.
दरम्यान, जखमींवर महाराष्ट्र व गुजरातच्या सीमेवर असलेल्या बोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर काही जखमींना आहवा- डांग येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.