नाशिकरोड : नाशिकरोड बसस्थानकातील पासधारकांसाठी असलेल्या तीन खिडक्यांपैकी एक खिडकी परिवहन महामंडळाने बंद केल्याने विद्यार्थी, कामगार व प्रवाशांची गैरसोय होत असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले होते. महामंडळ व्यवस्थापनाकडून बंद केलेली पासधारकांची खिडकी शुक्रवारी पुन्हा सुरू करण्यात आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. नाशिकरोड बसस्थानकातून मासिक, त्रैमासिक विद्यार्थी सवलत व ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी अहल्याबाई होळकर मोफत पास दिले जातात. जवळपास ६ हजार ५०० पासधारक पास घेतात. नाशिकरोडसह नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील विद्यार्थी, कामगार व प्रवासी शहराच्या विविध भागात जाण्यासाठी नाशिकरोड बसस्थानकाच्या पास केंद्रातून पास घेतात. तसेच उपनगर नाका बस पास केंद्र बंद करण्यात आल्याने तेथील २२०० पासधारकांचा भार नाशिकरोड बसस्थानकातील पास केंद्रावर पडलेला आहे. नाशिकरोड बसस्थानकात पासधारकांसाठी सुरू होणारी पहिली खिडकी सकाळी ७ वाजता उघडून दुपारी ३ वाजता बंद होते. दुसरी खिडकी सकाळी ८ वाजता उघडून दुपारी ४ वाजता बंद होते, तर तिसरी खिडकी सकाळी १० वाजता उघडून सायंकाळी ६ वाजता बंद होत होती. गेल्या दहा-बारा वर्षांपासून पासधारकांसाठी असलेले हे वेळापत्रक अत्यंत सोयीचे होते. मात्र शाळा-महाविद्यालयांना सुट्या असल्यामुळे मे महिन्यात महामंडळ प्रशासनाकडून सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत असलेली पासधारकांची एक खिडकी बंद करण्यात आली असून, ती पुन्हा सुरू करण्यात आलेली नव्हती. यामुळे मनमाड, इगतपुरी, लासलगाव आदी ठिकाणाहून रेल्वेने नाशिकरोडला येणारे कामगार, विद्यार्थी, प्रवासी यांची मोठी गैरसोय होत होती. तसेच ज्या विद्यार्थी, कामगारांना सकाळी ८ वाजेपर्यंत शाळा, महाविद्यालय अथवा कंपनीत दाखल व्हायचे आहे त्यांना पास केंद्राची खिडकीच ८ वाजता उघडत असल्याने विविध अडचणींना तोंड द्यावे लागत होते.याबाबत ‘लोकमत’मध्ये दोन दिवसांपूर्वी पासधारकांसाठी असलेली खिडकी बंद करण्यात आल्याने विद्यार्थी, कामगार व प्रवाशांच्या गैरसोयीबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते.
नाशिकरोड बसस्थानकातील बस पास खिडकी पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 11:48 PM