नाशिक : विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या ५९ दिवसांपासून एस. टी. कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपाच्या कालावधीत कधी बसेस पूर्णपणे बंद राहिल्या तर कधी माघारी फिरल्या. काही बसेस तर रिकाम्यादेखील धावल्या. त्यामुळे बसेस सुरू असल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र त्यापासून उत्पन्नदेखील मिळालेले नाही. नाशिकमध्ये पुणे, धुळे आणि बोरिवली मार्गावर धावणाऱ्या खासगी शिवशाही बसेसला काही प्रमाणात प्रवासी मिळत असल्याने अल्पसा दिलासा मिळाला आहे.
नाशिक विभाग एस. टी. महामंडळात जवळपास ८७१ बसेस असून, ५,२५४ इतके कर्मचारी आहेत. कोविडपूर्वी पूर्णक्षमतेने बसेस सुरू असल्याच्या काळात महामंडळाला दररोज किमान ८० ते ९० लाखांचे उत्पन्न मिळत होते. परंतु संपामुळे अनलॉकच्या या काळात महामंडळाचे दररोजचे ८० ते ९० लाखांचे उत्पन्न बुडत आहे. ५८ दिवसांच्या संपाचा विचार केला तर जवळपास ५० कोटींचा फटका महामंडळाला बसला आहे.
कोणत्या आगारात किती तोटा
संप काळात सर्वच बसेस बंद असल्याने सर्वच आगारांचे उत्पन्न बंद झाले आहे. नाशिक-१ आगारातून खासगी शिवशाही बसेस सुरू आहेत, तर पिंपळगाव, येवला, लासलगाव या तीन आगारांतून काही प्रमाणात बसेस सुरू झाल्या आहेत. परंतु त्यांनादेखील उत्पन्न मिळालेले नाही. नांदगाव, सिन्रर आणि इगतपुरी आगाराच्या बसेसदेखील सुरू झाल्या होत्या. परंतु सर्वच आगारे ही तोट्यात आहेत.
एवढे नुकसान कधी झालेच नाही
१) राज्य परिवहन महामंडाळात प्रथमच इतका प्रदीर्घ संप झाला असल्याने यंदा महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. यापूर्वी असा तोटा कधीही झालेला नव्हता.
२) कर्मचाऱ्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलन कधी केलेले नाही. महामंडळाच्या इतिहासातील हे सर्वांचे मोठे आंदोलन आहे.
मागील वर्ष कोरोनाचे
देशात १४ एप्रिलपर्यंत २०२० लॉकडाऊनची होते. २४ मार्चपासून लॉकडाऊनमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली. या २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाला आर्थिक फटका बसला. यंदादेखील फेब्रुवारी ते जून या कालावधीत बसेस बंद झाल्याने मोठा आर्थिक ताण महामंडळावर आला. त्यानंतर बसेस काही सुरू झाल्या मात्र प्रवासी बसकडे फिरकले नाही. दिवाळीत सर्वकाही सुरळीत झाले असे वाटत असतानाच एस. टी. कर्मचाऱ्यांनी संप पुकारला.