लोहोणेर : टोलच्या झोलमुळे तीन-चार दिवसांपासून कळवणहून कांचनबारीमार्गे नाशिक ही बस कळवण आगाराने बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय झाली असून, ही बस पूर्ववत सुरू करण्याची मागणी खर्डेसह वाजगाव, कनकापूर, कांचने, वडाळीभोई, कानमंडाळे, धोडांबे आदि गावातील नागरिकांनी केली आहे. कळवण कांचनबारीमार्गे नाशिक ही बससेवा महिनाभरापूर्वी कळवण आगाराने सुरू केली होती. मात्र पिंपळगाव बसवंत येथील टोलनाक्यावर या बसला एका फेरीसाठी ६८० रु पये टोलचा जास्त भुर्दंड भरावा लागत असल्याचे कारण सांगून कळवण आगाराने या मार्गावरील बसफेरी बंद केली आहे. माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या प्रयत्नातून २००० मध्ये कांचनबारीमार्गे नाशिक बससेवा सुरू झाली होती. ही बस दिवसातून दोन फेऱ्या मारत असल्याने या मार्गावरील वाजगाव, खर्डे, कनकापूर, कांचने, कानमंडाळे, धोडांबे, वडाळीभोई आदि गावांतील नागरिकांची सोय झाली होती. मात्र प्रवासमार्गावरील अडचणींमुळे अधून-मधून बससेवा बंद करण्यात येते अशी ओरड येथील नागरिक करीत असून, बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी परिसरातून जोर धरत आहे.(वार्ताहर)
टोलच्या झोलमुळे बससेवा बंद
By admin | Published: December 15, 2015 10:58 PM