नाशिकरोड : नाशिकरोड बसस्थानकात गेल्या ८-१० दिवसांपासून स्वच्छता-साफसफाईचा ठेका घेतलेल्या क्रिस्टल कंपनीचे कामगार कामावर येत नसल्याने नाशिकरोड बसस्थानक अस्वच्छतेचे आगर बनले आहे. ठिकठिकाणी पडलेला केरकचरा, दुर्गंधी यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत.संपूर्ण राज्यातील बसस्थानके, डेपो या ठिकाणी स्वच्छता व साफसफाईचा ठेका मुंबईतील क्रिस्टल कंपनीला गेल्या दीड-दोन वर्षांपूर्वी देण्यात आला आहे. बसस्थानकावर स्वच्छतेचे काम तीन पाळीत होणे अपेक्षित होत असताना नाशिकरोड बसस्थानकावर दोनच पाळीत स्वच्छतेचे काम केले जात होते. रात्रपाळीत काम होत नव्हते. नाशिकरोड बसस्थानकाचे आवार व गर्दी लक्षात घेऊन दोन पाळीत किमान पाच कामगार स्वच्छतेच्या कामासाठी पाहिजे होते. मात्र क्रिस्टल कंपनीकडून प्रत्येक पाळीत एकच कामगार स्वच्छतेचे काम करीत होता. त्यामुळे बसस्थानक परिसर पूर्णपणे स्वच्छ होत नव्हता.नाशिकरोड रेल्वेस्थानकात दररोज येणाºया-जाणाºया हजारो प्रवाशांपैकी जास्तीत जास्त प्रवासी शहर व जिल्ह्यात येण्या-जाण्यासाठी एसटी बसला पसंती देतात. पुणे, अहमदनगर व त्यापुढे जाणाºया-येणाºया बसेस नाशिकरोड बसस्थानक मार्गेच येता-जातात. तसेच आजूबाजूच्या पंचक्रोशीतील येणाºया-जाणाºया बसेस नाशिकरोड मार्गेच धावतात. यामुळे पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत प्रवाशांचा नाशिकरोड बसस्थानकावर सतत राबता असतो.नाशिकरोड बसस्थानकात गेल्या ८-१० दिवसांपासून स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या क्रिस्टल कंपनीचे कामगार साफसफाई करण्यासाठी येत नसल्याने नाशिकरोड बसस्थानक अस्वच्छतेचे आगर झाले आहे. ठिकठिकाणी साचलेला कचरा, हवेमुळे उडणारा कचरा, बसस्थानकातील फरशा न पुसल्याने पसरलेली दुर्गंधी प्रवाशांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहे. सुट्यांमुळे प्रवाशांची गर्दी दुपटीने वाढली असून, साफसफाई होणे बंद झाल्याने रंगरंगोटी, नवीन फरशा बसवून चकाचक असलेले बसस्थानक गचाळ होण्यास सुरुवात झाली आहे. एस.टी. महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नसल्याने प्रवाशांवर बसस्थानकात तोंडाला रुमाल लावून बसची वाट बघण्याची पाळी आली आहे.यामुळे उद्घोषणा केंद्र, पास खोली, कर्मचाऱ्यांच्या आराम करण्याच्या खोलीतदेखील घाण साचली असून कामगार त्रस्त झाले आहेत. सफाई करणारे कामगार येत नसल्याने झाडू, खराटे व स्वच्छतेची मशिनरी धूळखात पडून आहेत.नाशिकरोड बसस्थानक ‘बंद पोलीस चौकी’नाशिकरोड बसस्थानकाच्या आवारात पोलीस चौकी आहे. बस, रेल्वेस्थानक परिसरातील गर्दी व सुरक्षिततेच्या कारणास्तव बसस्थानकाच्या आवारात पोलीस चौकी सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांचे सामान, मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या, वादविवाद-मारामारी झाली किंवा अन्य काही घटना घडल्यावर संबंधित व्यक्ती पोलीस चौकीत गेल्यास सदैव चौकी बंद असते. प्रवाशांना तत्काळ पोलिसांची मदत मिळत नाही.अद्याप पाणी कनेक्शन नाहीनाशिकरोड बसस्थानकात प्रवाशांना पाणी पिण्यासाठी टाकी बसविण्यात आली आहे. मात्र या टाकीला दिलेल्या पाण्याच्या कनेक्शनमधून टाकीपर्यंत पाणीच पोहोचत नाही. त्या अगोदरच असलेले सुलभ शौचालय सर्व पाणी वापरून घेते. प्रवाशांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी त्या टाकीकरिता स्वतंत्र पाणी कनेक्शन लावणे गरजेचे आहे. परंतु एस.टी. महामंडळ व्यवस्थापन गांभीर्याने लक्ष देत नसल्याने त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. टाकीत पाणी येत नसल्याने सफाई कामगारांना बसस्थानकातील फरशा पुसण्यास अडचण निर्माण होते. एस.टी. महामंडळाचे दुर्लक्ष व प्रवाशांची गरज लक्षात घेऊन दानशूर प्रितपालसिंग लांबा, विक्की व प्रिन्सी लांबा यांनी गेल्या दीड वर्षापासून सकाळपासून सायंकाळपर्यंत फिरते जलसेवा केंद्र उपलब्ध करून दिले आहे.
बसस्थानक बनले कचऱ्याचे आगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 1:25 AM