नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी येथील सभेसाठी गावागावातून बसेस शिर्डीकडे पाठविण्यात आल्याने जिल्हाभरातील प्रवाशांची गैरसोय झाली, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसेस न मिळाल्याने त्यांची शाळादेखील बुडाली. शुक्रवारी पहाटेपासूनच प्रवासी बसस्थानके आणि बसथांब्यावर अडकून पडले होते. बसेस का बंद करण्यात आल्या याबाबत कोणतीच माहिती मिळत नसल्याने दिवसभर गोंधळाची परिस्थिती कामय होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डीत पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याने या कार्यक्रमासाठी गावागावातील नागरिकांना शिर्डीत घेऊन येण्याचे फर्मान असल्याने प्रशासनाला चांगलीच धावपळ करावी लागली. जिल्ह्यातून सुमारे २० हजार नागरिकांना शासकीय खर्चातून शिर्डीत घेऊन जाण्याचे उद्दिष्ट असल्याने प्रशासनाने जिल्ह्यातून ३१० बसेस राखून ठेवल्या होत्या. या सर्व बसेस शुक्रवारी पहाटेपासून गावागावात पोहचल्या आणि शिर्डीकडे रवानादेखील झाल्या. त्यामुळे एस.टी.ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.सकाळपासूनच बसेस नसल्यामुळे कामानिमित्त बाहेर जाणाºया नोकरदार आणि कामगारांची मोठी गैरसोय झाली. शाळा, महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी बसस्थानकात पोहचले मात्र बसेसच नसल्यामुळे त्यांना माघारी फिरकावे लागले. पहाटेपासून जिल्ह्यातील गावागावांमधून बसेस भरून शिर्डीकडे पाठविण्यात आल्यामुळे दिवसभरात ग्रामीण भागात दैनंदिन कामकाज करणाºयांची बसेसअभावी मोठी अडचण निर्माण झाली. शिर्डीतील मोदी यांच्या सभेसाठी घरकुल योजनांचा लाभ झालेले आणि प्रस्तावित लाभार्थ्यांबरोबरच ज्या गावात आणखी आवास योजना राबविण्यात येणार आहेत अशा सर्व गावांमधून जास्तीत जास्त नागरिकांना शिर्डीत घेऊन जाण्याचे नियोजन होते. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाकडे याची जबाबदारी सोपविण्यात आलेली होती. त्यानुसार जिल्हापातळीवर नियोजन करून अधिकाºयांकडे गावाची जबाबदारी देण्यात आली होती. जास्तीत जास्त नागरिकांनी सभेसाठी उपस्थित रहावे यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी गेल्या आठवडा भरापासून जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते.शिर्डी येथील मोदींच्या सभेसाठी जिल्ह्याभरातील १३ डेपोंमधून ३०१ बसेस पाठविण्यात आलेल्या आहेत. यातील बहुतेक बसेस या सप्तशृंगी देवीच्या यात्रेसाठी नियोजित केलेल्या जादा बसेस आहेत. याबसेस धुळे आणि पुणे डेपोंमधून मागविण्यात आलेल्या होत्या. याच बसेस शिर्डीसाठी रवाना करण्यात आलेल्या आहेत. मार्गावर बसेस नाहीतच असे नाही. साधारणपणे चार वाजेपर्यंत सर्व बसेस नाशिकला येतील त्यानंतर सेवा सुरळीत सुरू होऊ शकेल.- अरुण सिया, वाहतूक अधिकारी, एसटी महामंडळपूर्वसूचना न देताच बसेस बंदकोणतीही पूर्वसूचना नसताना बसेस बंद करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. बस नेमकी कधी येणार किंवा बसेस का बंद आहेत याची कोणतीही माहिती नियंत्रण कक्षाकडूनदेखील दिली जात नव्हती. त्यामुळे महाविद्यालयात जाता आले नाहीच. अनेक विद्यार्थी माघारी फिरले. कामानिमित्ताने नाशिकला जाणाºयांचेदेखील हाल झाले. नियमित रस्त्यावर धावणाºया बसेसदेखील नसल्याने काय झाले हे काहीच कळत नव्हते.- समाधान वाणी, ओझरप्रवाशांना गृहित धरणार का?मोदी यांच्या सभेसाठी जिल्ह्यातून बसेस पाठविण्यात आल्यामुळे दैनंदिन प्रवास करणाºया ग्रामस्थांचे हाल झाले. बसेस पाठविण्यात येणार नसल्याबाबत कोणतीही पूर्वसूचना महामंडळाकडून देण्यात आली नाहीच. शिवाय महामंडळाने पर्यायी व्यवस्थादेखील केली नसल्यामुळे प्रवाशांच्या समस्येत अधिकच भर पडली. विशेषत: शाळेत जाणाºया विद्यार्थ्यांना शाळेला दांडी मारावी लागली. स्थानकांवरदेखील प्रवासी अडकून पडले होते. इतक्या मोठ्या प्रमाणावर बसेस अधिगृहित केल्यामुळे याबसेस रस्त्यांवरून कमी होतील. याची जाणीव असूनही महामंडळाकडून मात्र कोणतेही नियोजन करण्यात आले नाही.
मोदींच्या सभेसाठी बसेस; पहाटेपासून प्रवासी ताटकळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 1:20 AM