नाशिक : सन २०१८ मध्ये शहरातील काही मेगा प्रकल्प बीओटीद्वारे साकारण्याचा संकल्प महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सोडला असून, त्यात प्रामुख्याने द्वारका सर्कलवरील महापालिकेच्या जागेत व्यापारी संकुलाची निर्मिती करण्याबरोबरच पेलिकन पार्क आणि फाळके स्मारकाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.अभिषेक कृष्ण यांच्या आयुक्तपदाच्या कारकिर्दीला रविवारी (दि.७) दीड वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना आयुक्तांनी सांगितले, नवीन वर्षात शहरातील काही मेगा प्रकल्पांना बीओटी व पीपीपी तत्त्वावर चालना देण्यात येणार आहे. त्यात द्वारका सर्कलवरील महापालिकेच्या जागेत व्यापारी संकुलाची निर्मिती केली जाणार आहे. सदर जागेतील व्यावसायिकांना व्यापारी संकुलात गाळेविक्री करताना प्राधान्य दिले जाणार असून, त्यासंदर्भात व्यावसायिकांनी संमतीही दर्शविली आहे. त्यांना गाळे उपलब्ध करून दिल्यास त्यांनी न्यायालयातील दावा मागे घेण्याची तयारी दाखविली आहे. याचबरोबर, सिडकोतील पेलिकन पार्कच्या जागेचाही पीपीपी तत्त्वावर विकास करण्यात येणार आहे. सदर जागेसाठी सल्लागार संस्थांनी दोन पर्याय सुचविले आहेत. त्यात अॅडव्हेन्चर पार्क उभारून महापालिकेने तिकीट विक्री करावी किंवा शेअरिंगमध्ये सदर प्रकल्प राबवावा. याशिवाय, आमदार सीमा हिरे यांनीही त्याठिकाणी नमो उद्यानाचा प्रस्ताव दिलेला असून तो शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. त्याला मान्यता मिळाल्यास त्याचाही विचार होईल. फाळके स्मारकाचाही याच पद्धतीने विकास करण्याचे नियोजन आहे. या तीनही प्रकल्पांना महासभेची मंजुरी घेऊन प्रकल्पांना येत्या आर्थिक वर्षात चालना दिली जाणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
द्वारका सर्कलवर व्यापारी संकुल : फाळके स्मारक, पेलिकन पार्कचे रूप पालटणार बीओटीद्वारे प्रकल्पांची उभारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 12:51 AM
नाशिक : सन २०१८ मध्ये शहरातील काही मेगा प्रकल्प बीओटीद्वारे साकारण्याचा संकल्प महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सोडला आहे.
ठळक मुद्दे प्रकल्पांना बीओटी व पीपीपी तत्त्वावर चालनापीपीपी तत्त्वावर विकास