नाशिक : महाराष्ट शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने २०१८ मध्ये घेतलेल्या शालेय कल चाचणीत नाशिक विभागातील विद्यार्थ्यांचा कल वाणिज्य आणि ललित कला विषयाकडे अधिक असल्याचे समोर आले आहे. यावर्षी आरोग्य विद्याशाखेकडे जाण्याचा कलही वाढला असून, तांत्रिक विषयाला विद्यार्थ्यांनी फारसे प्राधान्य दिले नसल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. नाशिक विभागातील सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांची कल चाचणी घेण्यात आली होती. या कल चाचणीचा अहवाल नुकताच समोर आला आहे. शालेय शिक्षण विभाग, श्यामची आई फाउंडेशन, मानसशास्त्र विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सहकार्याने सदर कल चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. दहावीनंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र निवडण्यासाठी मदत व्हावी किंबहुना त्यांना त्यांचा कल लक्षात यावा यासाठी विद्यार्थ्यांची कल चाचणी परीक्षा घेतली जाते. परीक्षेनंतर विद्यार्थ्यांची होणारी धावाधाव थांबून त्यांना अभ्यासक्रम निवडीसाठी पुरेसा वेळ मिळावा तसेच पालकांनादेखील मुलांमधील क्षमता लक्षात यावी यासाठी कल चाचणीचा उपयोग महत्त्वाचा मानला जातो.महाराष्ट्र शासनाच्या महाकरिअर मित्र या पोर्टलवर कल चाचणी अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असून, यानुसार राज्यभरातील विद्यार्थ्यांचा कल समोर आला आहे. यामुळे महाराष्ट्रातील अति दुर्गम भागातील विद्यार्थीसुद्धा त्यांच्या आवडीचे क्षेत्र आणि उपलब्ध संधी यांची संपूर्ण माहिती पाहू शकतील. विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रांचे व तज्ज्ञांचे मार्गदर्शनात्मक व्हिडीओजदेखील विद्यार्थी पोर्टलवर पाहू शकतात. विविध विषयांवरील लेखही वाचू शकतील.प्रत्यक्ष प्रवेशाला खरे चित्र होणार स्पष्टविद्यार्थ्यांची आवड कोणत्या क्षेत्राकडे आहे याची जुजबी माहिती पालकांना व्हावी आणि पालकांना त्याच्यावर आपल्या अपेक्षांचे ओझे न लादता आपल्या मुला-मुलीचा काय शिकण्याकडे कल आहे याची जाणीव पालकांना व्हावी, यासाठी शासनाच्या वतीने सदर कल चाचणी परीक्षा घेतली जाते. अशाप्रकारचा कल दिसत असला तरी प्रत्यक्षात प्रवेशाच्या वेळी विद्यार्थी कोणत्या शाखेला प्रवेश घेतात यावरही अभ्यासक्रमाचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. तूर्तास राज्यात सर्वत्र वाणिज्यचा बोलबाला असल्याचे अहवालावरून दिसते. राज्यभरातून घेण्यात आलेल्या या कल चाचणीत विद्यार्थ्यांचा कल जाहीर करताना त्यांच्यासाठी शासनाच्या विविध शैक्षणिक संस्थांमधील अभ्यासक्रमाची माहितीदेखील देण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या जवळपास १९००० शासन मान्य कॉलेजेसचे ८०००० हून अधिक शैक्षणिक पर्यायांची माहिती देण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील अशा विद्यार्थ्यांना यामुळे स्वत:चे करिअर निवडण्याची समान संधी मिळू शकते. राज्यातील अमरावती, औरंगाबाद, कोकण, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे या नऊ विभागातून सुमारे १७ लाख विद्यार्थ्यांची कल चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. नाशिक जिल्ह्यातून कल चाचणी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १लाख ५० हजार ६८२ इतकी होती.
नाशिक विभागातील विद्यार्थ्यांचा वाणिज्यकडे कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:30 AM