संजय शहाणे
नाशिक - अंबड औद्योगिक वसाहतीतील एका खासगी कंपनीचा सीईओ योगेश सुरेश मोगरे यांच्यावर गुरुवारी (दि.२३) रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास दोन हल्लेखोरांनी चाकूने आठ ते दहा वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फाळके स्मारक भागात मुंबई - आग्रा महामार्गालगत असलेल्या आंगण हॉटेलसमोर ही घटना घडली असून हल्लेखोरांनी मोगरे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर त्यांचीच चारचाकी गाडी हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी ही चारचाकी वाडीवऱ्हे ते गोंदे दुमाला दरम्यान आढळून आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश मोगरे (३९, फ्लॅट नंबर ८६ कालीबारी सोसायटी, पाथर्डी फाटा) अंबड औद्योगिक वसाहतीतील रोहिणी इंडस्ट्रीज या कंपनीत सिईओ पदावर कार्यतर होते. ते गुरुवारी (दि.२३) सकाळी साडे आठ वाजता नेहमीप्रमाणे कंपनीत (एमएच १५ एचवाय ४९५९) या कारने गेले होते. दुपारी बारा वाजेच्या सुमारास त्यांनी त्यांची गाडी त्रंबकनाका येथील सर्विस स्टेशनला सर्विस केल्यानंतर मोगरे त्यांच्या कंपनीचे कॉन्टॅक्टर सोनू कुहाडे यांच्यासमवेत कंपनीच्या कामानिमित्त डहाणू येथे गेले असताा योगेश मोगरे यांचे त्यांची पत्नी विजया यांच्यासोबत मोबाईलवर बोलणे झाले होते. त्यानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास विजया यांना सोनू कुहाडे यांनी मोबाईलवरून योगेश मोगरे कंपनीतून घरी येत असताना त्यांच्यावर पांडवलेणी, फाळकेस्मारक भागात हल्ला झाल्याची माहिती दिली. त्यानुसार, आंगण हॉटेलसमोर दोघांनी त्यांच्यावर चाकूने छातीवर, मानेवर, हातावर, चेहऱ्यावर आठ ते दहा वेळा वार केले. त्यामुळे त्यांना औषधोपचारासाठी तत्काल खासगी रुग्णलायात दाखल करण्यात आले. मात्र मोगरे हल्ल्यात गंभीर जखमी झालेले असल्याने शुक्रवारी (दि.२४) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्यांचा औषध उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या प्रकरणात इंदिरानगर पोलिस ठाण्यात योगेश मोगरे यांच्या पत्नी विजया मोगरे यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हल्लेखोरांनी योगेश मोगरे यांच्यावर धारदार शस्त्राने वार केल्यानंतर त्यांची कारही पळवून नेली होती. ही कार रात्री एक वाजेच्या सुमारास गोंदे शिवारातील व्हीटीसी फाटा येथील बंद पडलेल्या कंपनी समोरील रस्त्यावर आढळून आली आहे. गाडीतील इंधन संपल्याने हल्लेखोरांनी वाहन बेवारस स्थितीत सोडून पळ काढल्याची सांगितले.