सिन्नर : चालकाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून फोर्ड फिगो कार लांबविणाºया वाहनचोर टोळीचा पर्दाफाश करण्यात नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे. चोरीला गेलेली कार पोलिसांनी जप्त केली आहे. वाहनचोर टोळीतील दोघांना पोलिसांनी अटक केली असून, अन्य तीन फरार आरोपींचा पोलीस शोध घेतआहेत. वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून रविवारी (दि. ८) अज्ञात चौघा चोरट्यांनी चालक संतोष वसंत यादव (रा. मुसळगाव, ता. सिन्नर) याच्या ताब्यातील फोर्ड फिगो कार (क्र. एमएच ४३ एएफ ७०६७) चोरून नेली होती. सिन्नर येथील पंचवटी हॉटेलपासून या चौघांनी शिर्डी येथे दर्शनाला जायचे कारण सांगून संतोष यादव याची फोर्ड फिगो कार भाड्याने नेली होती. शिर्डी येथे दर्शन आटोपून पुन्हा सिन्नरकडे येत असताना मीरगाव शिवारात लघुशंकेला थांबण्याचा बहाणा करून या चौघांनी चालकाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्याच्याकडील २२ हजार रुपये व कार घेऊन पोबारा केला होता. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात वाहनचोरीचा गुन्हा दाखल केला होता. वावी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक रणजित आंधळे या प्रकरणी तपास करीत होते. पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक लगतच्या जिल्ह्यांमध्ये तपासासाठी रवाना करण्यात आले होते. वाहनचोरी करणाºया चोरट्यांची माहिती घेण्याचे काम या पथकाकडून सुरू होते. याचवेळी गुप्त बातमीदाराच्या आधारे या गुन्ह्यातील आरोपी लगतच्या अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी व श्रीरामपूर भागातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक श्रीरामपूर व राहुरी भागात रात्रभर गस्त घालून सापळा रचून होते.जोगेश्वरी आखाडा शिवारातून (जि. नगर) या पथकाने संशयित आकाश संजय गायकवाड (१९), रा. उक्कलगाव ता. श्रीरामपूर व दीपक ऊर्फ बबलू पोपट कोबरणे (१९), रा. राहुरी यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीला गेलेली कार ताब्यात घेतली. या चोरीत त्यांच्या सोबत संशयित राजू बाळू गुंजाळ (रा. उक्कलगाव, ता. श्रीरामपूर), किरण नानासाहेब दुशिंग (रा. उमरे, ता. राहुरी) व मनोज गोरख मांजरे (रा. मातापूर, ता. श्रीरामपूर) असे आणखी तिघे असल्याची माहिती तपासात पुढे आली. संशयितांना अटक करण्यासाठी व चोरीला केलेली कार ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकात आशिष अडसूळ, रवींद्र शीलावट, रवि वानखेडे, प्रीतम लोखंडे, दीपक अहिरे, प्रकाश चव्हाणके, दिलीप घुले, राजू दिवटे, अमोल घुगे, संदीप हांडगे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिराम, लहू भावनाथ, भाऊसाहेब टिळे हे पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.नंबरप्लेट बदलून कारचा वापरसदर संशयित कारची नंबरप्लेट बदलून कार वापरत असल्याचे पोलिसांना आढळून आले. संशयितांची टोळी ही सराईत असून, त्यांच्याविरोधात अहमदनगर जिल्ह्यात यापूर्वी वाहनचोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या संशयित आरोपींकडून आणखी लूटमारीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
वाहनचोरी करणाºया टोळीचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 1:01 AM