नाशिक : पिंपळगाव बसवंत येथील श्रीनिवास ज्वेलर्सच्या स्टाँगरूमची तिजोरी उघडून तीन कोटी १६ लाख ५० हजार रुपये किमतीच्या १० किलो ४७६ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांच्या धाडसी चोरीचा ग्रामीण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत पर्दाफाश केला़ विशेष म्हणजे चोरट्यांनी पुरावा सापडू नये यासाठी दुकानातील सीसीटीव्हीच्या केबल कापून फुटेजचे तीन डीव्हीआर मशीनही चोरून नेले होते़ या चोरीत दुकानातील दोघा कर्मचाºयांसह आणखी एकाचा सहभाग निष्पन्न झाला असून, त्यांच्याकडून चोरीचे सोन्याचे दागिने जप्त केल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी शनिवारी (दि़२३) पत्रकार परिषदेत दिली़ निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील अॅक्सिस बँकेशेजारी अशोक चोपडा यांचे श्रीनिवास ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे़ गुरुवारी (दि़२१) मध्यरात्रीच्या सुमारास या दुकानाच्या स्ट्राँगरुममधील तिजोरी उघडून कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिन्यांची धाडसी चोरी करण्यात आल्याची घटना घडली होती़ या चोरीचा तपास करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे व पथकातील अधिकारी कर्मचाºयांनी तिजोरीची बारकाईने पाहणी करून दुकानात काम करणारे सेल्समन, सेल्सगर्ल, कारागीर, शिपाई, सुरक्षारक्षक अशा चौदा जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली़ पोलिसांना दुकानात साफसफाईचे काम करणारा उंबरखेड रोडवरील हनुमान चौकातील विधी संघर्षित बालकाबाबत संशय आल्याने कसून चौकशी केली़ या मुलाकडे दुकानाची साफसफाई, दुकान बंद केल्यानंतर दुकानाच्या सर्व चाव्या वरच्या रुममध्ये ठेवणे व सकाळी दुकान उघडताना सर्व चाव्या मालकास आणून देण्याचे काम होते़ त्याची कसून चौकशी केली असता दुकानातील सेल्समन संजय देवराम वाघ (३२, रा़परसूल, ता़चांदवड) याच्या मदतीने सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची कबुली दिली़संजय वाघ हा २०१५ पासून दुकानात कामास असल्याने त्याच्याकडे दररोज स्ट्राँगरूम उघडून दुकान लावणे तसेच रात्री दुकान आवरून दागिने तिजोरीत ठेवण्याचे काम होते़ या विधीसंघर्षित बालक व वाघ या दोघांनी तिजोरीतील चोरी केलेले दागिने बॅगमध्ये भरले़ वाघ याने ही बॅग चांदवड तालुक्यातील परसूल येथील भाचा संशयित गोपीनाथ दत्तू बरकले (२५) याच्याकडे देऊन लपवून ठेवण्यास सांगितले़ स्थानिक गुन्हे शाखेने या चोरीची उकल करून हे सर्व दागिने हस्तगत केले़ सराफी दुकानातील सोने चोरीप्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात संशयित संजय वाघ, गोपीनाथ बरकले व विधीसंघर्षित बालक या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़ ही कारवाई पोेलीस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय अधिकारी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक करपे, सहायक पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ, राम कर्पे, पोलीस उपनिरीक्षक मालचे यांसह स्थानिक गुन्हे शखेच्या कर्मचाºयांनी केली़ न्यायालयाने दोघांना पोलीस कोठडी, तर विधीसंघर्षित बालकाची रिमांड होममध्ये रवानगी केली़एकाचे भांडण, तर दुसºयाला श्रीमंतीची लालसादुकानात कामास असलेल्या विधीसंघर्षित बालकाचे दुकानमालकाची मुले सिद्धार्थ व रौनक यांच्याशी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते़ याचा राग त्याच्या मनात होता, तर सेल्समन संजय वाघ याला झटपट श्रीमंत होऊन आलिशान जीवन जगण्याची लालसा होती़ दुकानातील दररोजचा व्यवहार माहिती असलेल्या वाघ याने मालकासोबत भांडण झालेल्या विधीसंघर्षित बालकाचा वापर करून घेतला़अशी केली चोरी़़़आठ दिवसांपूर्वीच चोरीचा प्लॅन ठरवून घटस्थापनेचा मुहूर्त ठरविण्यात आला होता़ विधीसंघर्षित बालकाने नेहमीप्रमाणे दुकान बंद झाल्यानंतर तिजोरीच्या चाव्या स्वत:जवळ ठेवून इतर चाव्या नेहेमीच्या ठिकाणी ठेवण्याचा बनाव केला़ तसेच दुकानाच्या मागील बाजूस वाड्याचा दरवाजा उघडा ठेवून निघून गेला़ रात्री नऊच्या सुमारास त्याने चिंचखेड फाट्यावर वाघ यास तिजोरीच्या चाव्या दिल्या़ यानंतर दुचाकीने पाठीमागून दुकानाजवळ येऊन सर्वजण झोपल्याची खात्री केली़ यानंतर दुकानाच्या छताची काच फोडून तळमजल्यावरील तिजोरी चावीने उघडून दहा किलो ४७५ ग्रॅम सोन्याचे दागिने बॅगमध्ये भरून चोरून नेले़ पहाटे दागिन्यांची बॅग चांदवड तालुक्यातील परसूल येथील भाच्याकडे नेऊन दिली़पाणबुड्याने काढली विहिरीतील बॅगसेल्समन संजय वाघ याने सोन्याच्या दागिन्यांची बॅग आपला परसूल येथील भाचा गोपीनाथ बरकले याच्याकडे सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी दिली़ त्याने बॅमधील काही दागिने विहिरीजवळील झुडपात, तर दागिन्यांची बॅग व सीसीटीव्हीचे डीव्हीआर मशीन स्टॅबिलायझर विहिरीत लपवून ठेवली़ पोलिसांनी पाणबुड्याच्या साहाय्याने विहिरीतील दागिन्यांची बॅग व डीव्हीआर मशीन पाण्याबाहेर काढले़ संशयितांकडून ७ किलो २१ ग्रॅम सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे़
कोट्यवधींच्या सोने चोरीचा २४ तासांत पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 1:02 AM