यदु जोशीलोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी शनिवारी प्रदेश भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली. आपले सरकार डबल इंजिनचे आहे; पण यामागे असलेले कार्यकर्ते, नेत्यांच्या डब्यांना विसरू नका, अशी सूचना करीत त्यांनी व्यथा मांडली.
भगिनी पंकजा मुंडे यांना पक्षात हवे तसे स्थान मिळत नसल्याची वेदना यामागे होती, असे म्हटले जात आहे. तथापि, प्रीतमताईंनी प्रातिनिधिक विचार मांडले, अशीही चर्चा नंतर बैठकीच्या परिसरात होती. प्रीतम मुंडे म्हणाल्या की, मराठा, धनगर समाजाला आरक्षण हे मिळालेच पाहिजे. ओबीसी व इतर समाजांना आरक्षणाचे लाभ मिळतात. तसा सत्तेचा लाभ पक्षातील कार्यकर्त्यांना मिळाला पाहिजे. भाजपसाठी खस्ता खाणाऱ्यांना पक्षात आरक्षण मिळाले पाहिजे. जुनेजाणते नेते, कार्यकर्ते हे फिक्स्ड डिपाॅझिटसारखे आहेत. त्यावर त्यांना योग्य ते व्याज मिळायला हवे.
माझ्याच बाबतीत असे का? शेलार यांनी व्यक्त केली खंत
nसरकारचा कार्यकाळ संपायला तीन महिने उरलेले असतात तेव्हा मला मंत्री केले जाते. मंत्रिपदाची संधी असताना मला पक्षसंघटनेत पाठविले जाते. आता आधी सुधीरभाऊंना बोलण्याची संधी दिली. nभाऊंनंतर माझे भाषण ठेवले. त्यामुळे माझ्याजवळ मुद्दे उरत नाहीत. माझ्याच बाबतीत असे का होते? असा सवाल करीत मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी मनातील सल बोलून दाखविली. nशेलार यांनी गमतीने हा उल्लेख केला; पण त्यामागे शल्य होते, अशी चर्चा कार्यकारिणीस्थळी होती.