नाशिक : नवरात्र आणि त्यापाठोपाठ येणारा दिवाळी सण यामुळे कापड बाजारात नवचैतन्य संचारले असून, बाजारात तेजी आली आहे. ग्राहकांचा यंदा ट्रॅडिशनल लुकमध्ये वेस्टर्न कलर आणि कल्चरच्या कपड्यांची तरुणाईला भुरळ पडत आहे. तर महिला वर्गाकडून व ज्येष्ठांकडून राष्ट्रीय पारंपरिक पोषखांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याने कापड बाजारात उत्साह निर्माण झाला आहे. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर महिलांकडून विविध नऊ रंगांच्या साड्यांना मागणी वाढली आहे. नाशकातील महिलांकडून पैठणीला सर्वाधिक पसंती मिळत असली तरी कंची, कांजीवरम, स्टोनवर्क, नेटवर्क, चिकन, गोटापत्तीवर्क तसेच सिंथेटीक आणि ज्यूट आदी साड्यांच्या खरेदीसाठीही दुकानांमध्ये गर्दी वाढू लागली आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये महिलांकडून विविध नऊ रंगांच्या साड्यांमध्ये पूजा केली जाते. त्यामुळे अशा नऊ रंगांच्या साड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली असून अनेक मैत्रणींचे, बचत गटांचे व सोसायट्यांचे महिलांचे ग्रुप एकत्रितपणे साड्यांची खरेदी करीत असल्याने शहरातील कापड बाजारासह विविध साड्यांचे शोरूम गर्दीने फुलून गेले आहेत. उच्च वर्गातून महागड्या साड्यांना चांगली मागणी असली तरी सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वच स्तरातून ग्राहकांचा ओघ वाढत असल्याने विक्रेत्यांनी कमीत कमी किमतीपासून अधिकाधिक किमतीच्या आणि वेगवेगळ्या दर्जा आणि फॅशनच्या साड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. सध्या नवरात्रोत्सवासोबतच दिवाळीचीही खरेदी सुरू झाली आहे. कापड बाजारात सध्या काठापदराच्या साड्यांसह पैठणी, सिल्क, सिंथेटिक, ज्यूटच्या पार्टीवेअर, फॅशनेबल साड्यांना मोठी मागणी आहे. नवरात्र आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कापड विक्रेत्यांनी वेगवेगळ्या सवलती जाहीर केल्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद वाढत आहे. सध्या बदलत्या ट्रेंड व फॅशननुसार विविध प्रकारचे कपडे बाजारात उपलब्ध आहेत.
मालिका चित्रपटांमधील साड्यांची क्रेझटीव्ही मालिका व चित्रपटात वापरण्यात आलेल्या साड्यांची महिलांमध्ये सध्या क्रेझ दिसून येत आहे. सिल्कमध्ये विविध प्रकार बाजारात आले असून, त्यात मॉडर्न कलरना चांगली मागणी आहे. अंजिरी, रिलिक्स ग्रीन, लक्स ब्लू असे विविध कलर आले आहेत. साड्यांमध्ये कंची, कांजीवरम, स्टोनवर्क, नेटवर्क, चिकन, गोटापत्ती वर्क आदी साड्यांना मागणी आहे. तर पुरुषांमध्ये कुर्ता, सिंघम शर्ट, चेक्स कॉटन शर्ट, पँट असे विविध प्रकार उपलब्ध आहेत. सोबतच जॅकेट, कुडत्याबरोबरच धोती-कुडत्यालाही मागणी वाढली आहे. त्यात गोल्ड व मरून कलर या ट्रॅडिशनल कलरबरोबरच ब्रॉईट कलर्सनाही तरुणाईची पसंती वाढत आहे.