सुनील गायकवाड, येवला (जि नाशिक): सरकारने मोठा गाजावाजा करत 2410 रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी नाफेड मार्फत करू असे सांगितले, मात्र शेतकऱ्याच्या कांद्याला आज लिलाव सुरू होताच अल्प दर पुकारला जात असल्याने शेतकऱ्यांनी घोषणा देत लिलाव बंद पाडले.
नाफेड मार्फत कांदा खरेदीच्या वलग्ना हवेतच विरल्या असून हे सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करीत असल्याचा आरोप करून येवल्यातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडत रास्ता रोको आंदोलन केले. संचालक मंडळाने मध्यस्ती करत त्वरित काही तरी तोडगा काढू असे सांगत शेतकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले. जो पर्यंत नाफेड मार्फत कांदा खरेदी सुरू केली जात नाही, व जो पर्यंत कांद्याला समाधानकारक भाव मिळत नाही, तो पर्यंत कांद्याचे लिलाव होऊ देणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.