नाशिक : ‘आम्हीच आमचे सरकार’ असे म्हणून भारत सरकारच्या कायदेकानूनला विरोध दर्शविणाऱ्या ए. सी. भारत सरकारला मानणाऱ्या सुरगाणा तालुक्यातील बोरीचा पाडा, डोंगरपाडा, कुकडणे या आदिवासीबहुल पाड्या-वाड्या-वस्त्यांमध्येही कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यास विरोध दर्शविला जात असून, गावोगावी लसीकरणासाठी जाणाऱ्या वैद्यकीय पथकाला या आदिवासी नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे.
‘ॲन्टिख्रिस्त’ म्हणवून घेणाऱ्या भारत सरकारच्या सदस्यांच्यामते पृथ्वीतलावर सर्वात आधी आदिम जमात जन्माला आली. त्यामुळे या पृथ्वीचे व पर्यायाने या भूमीचे मालक तेच असल्याने नंतर अस्तित्वात आलेल्या कोणत्याही सरकारचे कायदे कानून मानण्यास ते तयार नाहीत. त्यामुळे आजवर मतदार ओळखपत्र (शेषन कार्ड), रेशनकार्ड, स्वस्त धान्य, मतदान प्रक्रियेवर या जनतेचा विश्वास राहिलेला नाही. परिणामी सध्याच्या आधुनिक युगातही भौतिक सुखांपासून वंचित राहून या आदिवासींनी आपल्या परंपरागत रूढी-परंपरा कायम ठेवत वैद्यक शास्त्राला दूर सारत जंगलातील जडी-बुटी व कंदमुळांच्या माध्यमातूनच आरोग्याचा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले आहे. सुरगाणा तालुक्यातील बोरीचा गावठा, दौडीपाडा, गुंडाळविहीर, म्हैसखडक, बाफळण, कोठुळा, उंबराचा पाडा या भागात स्वत:ला ए.सी. भारत सरकारचे अनुयायी म्हणवून घेणाऱ्या नागरिकांनी देशपातळीवरील कोरोना लसीकरणात सहभागी होण्यास नकार दिला आहे.
आदिवासी असलेल्या सुरगाणा तालुक्यात कोरोना लसीकरणाचे प्रमाण कमी असून, आरोग्य विभागासाठी ही बाब चिंतेची आहे. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी आरोग्य विभागाने प्रत्येक गावातील शासकीय कर्मचारी, शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविकांना लस देऊन ती सुरक्षित असल्याचा निर्वाळा देण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरून गावातील आदिवासींमध्ये जागृती होईल, यासाठी प्रयत्न चालविले आहेत. मात्र आरोग्य खात्याचे पथक या गावांमध्ये गेल्यास ‘अजिबात गावात पाय ठेवायचा नाही’ अशा धमक्या त्यांना मिळू लागल्या आहेत. ‘कोरोनाची लस घेतल्यास मृत्यू होतो’ असा गैरसमज मोठ्या प्रमाणात पसरल्याने लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याचे डॉ. मधुकर पवार यांचे म्हणणे आहे. मात्र ए. सी. सरकारला मानणाऱ्या विशिष्ट वर्गातील दुसरी पिढी आता हळूहळू पुरोगामी होत असल्याचेही आरोग्य खात्याचे म्हणणे असले तरी, ए. सी. भारत सरकारचे प्राबल्य असलेल्या पाडे, वाड्यांवर अद्याप तरी एकही लसीकरण झाले नसल्याचे समोर आले आहे.
चौकट
====
काय आहे ए. सी. भारत सरकार?
‘ए. सी. भारत सरकार’चे मुख्यालय महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेवरील धरमपूरनजीकच्या मोरदहाड येथे आहे. ए. सी. म्हणजे ‘अॅन्टिख्रिस्त’ (ख्रिश्चनविरोधक) असे ते स्वत:ला म्हणवून घेतात. ए. सी. कुंवर केसरसिंह माताश्री जमनाबाई पिताश्री टेटिया कावनजीभाई हे त्यांचे प्रमुख होते. काही वर्षांपूर्वीच ते निवर्तले. आता त्यांच्याजागी मुलगा राजेंद्रसिंह हा सारी सूत्रे सांभाळतो. भारत सरकारचे सदस्य सुरगाणा तालुक्यातील दौडीपाडा, गुंडाळविहीर, म्हैसखडक, बाफळण, कोठुळा, उंबराचा पाडा या गावांमध्येही वास्तव्यास आहेत. याशिवाय राजस्थान, मध्य प्रदेश, दमण-दीव व गोवा येथेही ए. सी. भारत सरकारने हात-पाय रोवले आहेत.