नाशिक : तीन वर्षापुर्वी पहाटे ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या करून फरार झालेले मारेकरी पोलिसांच्या हाती अद्यापही लागलेले नसून, त्यांच्या शोधासाठी पोलीस जंगजंग पछाडत असताना संशयीत मारेकरी नाशिक भागाकडे लपल्याच्या संशयावरून कोल्हापूर पोलिसांनी नाशिक शहरात ठिकठिकाणी पोस्टर्स लावले आहेत. दोघा मारेक-यांच्या छायाचित्रांसह लावण्यात आलेल्या या पोस्टर्सवर मारेक-यांची माहिती देणा-यांना दहा लाख रूपयांचे बक्षिस देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.कोल्हापूर येथे १६ फेब्रुवारी २०१५ मध्ये सकाळी मॉर्निंग वॉकसाठी कॉ. गोविंद पानसरे व त्यांची पत्नी उमा हे घराबाहेर पडले होते. फिरून परत आल्यानंतर त्यांच्या घराजवळच दोघा अज्ञात मारेक-यांनी कॉ. पानसरे यांच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडल्या होत्या. त्यात गंभीर जखमी झालेले पानसरे हे रूग्णालयात उपचार घेत असताना २० फेब्रुवारी रोजी मरण पावले. या घटनेने संपुर्ण महाराष्टÑात खळबळ उडाली होती. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्त्येनंतर कॉ. पानसरे यांचीही त्याच पद्धतीने हत्या करण्यात आल्याने राज्य सरकार टिकेचे धनी झाले होते. या प्रकरणी कोल्हापुरच्या राजापुरी पोलीस ठाण्यात अगोदर दोघा अज्ञात मारेक-यांविरूद्ध प्राणघातक हल्ला, खून, कट रचने अशा गंभीर स्वरूपाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु पोलिसांना आरोपी सापडले नाहीत. घटनेच्या प्रत्यक्षदर्शी साक्षिदार उमा पानसरे यांनी हल्लेखोरांचे केलेल्या वर्णनाच्या आधारे पोलिसांनी संशयितांचे रेखाचित्र तयार केले होते. या संदर्भात न्यायालयात काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याचिका दाखल करून पानसरे यांच्या हत्येचा लवकरात छडा लावण्याची मागणी केली आहे. त्याबाबत न्यायालयाने देखील पोलिस यंत्रणेला वेळोवेळी धारेवर धरले आहे. या सर्व पार्श्वभुमीवर पोलिसांनी संशयित आरोपी विजय बाबुराव पवार रा. उंब्रज ता. कराड (सातारा) व सारंग दिलीप अकोळकर रा. चिंतामणी अपार्टमेेंट, ५१९ शनिवार पेठ, पुणे या दोघांना ‘वॉटेंड’ ठरवून त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांनी ठिकठिकाणी केलेल्या तपासात आरोपींचा ठाव ठिकाणा लागू शकला नाही, त्यामुळे ते नाशिक परिसरात असण्याच्या शक्यतेने कोल्हापुर पोलिसांनी नाशिक शहरात ठिकठिकाणी पोस्टर्स लावून मारेक-यांबाबत माहिती दिली आहे तसेच त्यांची माहिती देणा-यास दहा लाख रूपयांचे बक्षिस देण्याचे जाहीरही केले आहे. सदरचे पोस्टर्स प्रामुख्याने जॉगींग ट्रॅक तसेच सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आले आहेत.
कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा नाशकात शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 2:34 PM
कोल्हापूर येथे १६ फेब्रुवारी २०१५ मध्ये सकाळी मॉर्निंग वॉकसाठी कॉ. गोविंद पानसरे व त्यांची पत्नी उमा हे घराबाहेर पडले होते. फिरून परत आल्यानंतर त्यांच्या घराजवळच दोघा अज्ञात मारेक-यांनी कॉ. पानसरे यांच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडल्या होत्या. त्यात गंभीर जखमी झालेले पानसरे हे रूग्णालयात उपचार घेत असताना २० फेब्रुवारी रोजी मरण पावले.
ठळक मुद्देशहरात पोस्टर्स : माहिती देणा-यास दहा लाखाचे बक्षिसकॉ. पानसरे यांच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडल्या होत्या