देवळाली कॅम्प : येथील सह्याद्रीनगर, चारणवाडीलगत असलेल्या गावंडे मळे परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार होत असल्याने बिबट्याच्या भीतीमुळे या भागातील शेतकरी व नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याच्या मागणीची दखल घेत गुरुवारी वनविभागाने पिंजरा लावला आहे. शिंगवे बहुला गावाच्या उत्तर दिशेला असणाऱ्या मळे परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असून, चार- पाच दिवसांपूर्वी काही महिला शेतात पाणी भरण्यांसाठी गेल्या असता त्यांना बिबट्या दिसला. गावाच्या उत्तर दिशेला घनदाट जंगल परिसर व मळेभाग आहे. त्या भागात अनेक वन्य पशुचे वास्तव्य आहे. या भागात बिबट्याचे अस्तित्व वारंवार सिद्ध होत असल्याने नागरिक व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याची दखल घेत वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला असून, कधी एकदाचा बिबट्या जेरबंद होतो याकडे स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
देवळालीत बिबट्यासाठी लावला पिंजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 1:01 AM