जायखेडा : बागलाण तालुक्यातील ब्राह्मणपाडे एकलहरे शिवारात काल रात्री बारा वाजेच्या सुमारास येथील शेतकरी दोघा काशीराम आहिरे यांच्या शेतातील घराशेजारच्या गोठ्यात बांधलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला करून वासरू ठार केले.वासराच्या आवाजाने घरातील सदस्यांना जाग येऊन त्यांनी गोठ्याकडे धाव घेतली. घरातील लोकांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने डरकाळ्या फोडीत धूम ठोकली. सकाळी वनरक्षक ज्ञानेश्वर सोनवणे व वनकर्मचारी कैलास पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.येथील वस्तीपासून जवळच डोंगर असल्याने या परिसरात नेहमी बिबट्याचे वास्तव्य असते. गेल्या दोन महिन्यांत बिबट्याने पाच ते सहा शेळ्या व बोकड ठार केले असल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली. वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.