विंचूरदळवी : सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवी येथील चद्रे वस्तीवर बुधवार मध्यरात्री बिबट्याने लोखंडी पत्र्याचे शेड तोडून वासरावर हल्ला करीत त्याला ठार केल्याची घटना घडली. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीने वातावरण निर्माण झाले आहे.वाळु सुखदेव चद्रे यांचा चद्रे मळा परिसरात घरापासून काही अंतरावर गोठा आहे. चद्रे नेहमीप्रमाणे सायंकाळी चारा पाणी करून गाय व वासरू गोठयात बांधून घरी आले. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास बिबट्याने गोठ्याला संरक्षण म्हणून लावलेले लोखंडी पत्रे पाडून आत प्रवेश केला. त्यात एक महिन्याच्या वासराला त्याने लक्ष बनविले. या वासराला ठार मारत त्याने त्याच्यावर ताव मारायला सुरुवात केली. पत्र्याच्या जोराचा आवाज आल्याचे लक्षात येताच जवळच घर असलेल्या चद्रे यांनी गोठ्याकडे धाव घेतली मात्र त्यांची चाहूल लागताच बिबट्याने मृत केलेल्या वासराचा मृतदेह घेऊन धूम ठोकली. दरम्यान, परिसरामध्ये बिबट्याचा नियमित वावर असून त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात वासरु ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 6:27 PM