गंगापूर : मनोली गाव परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार झाल्याची घटना घडली. रात्रीच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला केला. शेजारील गाईच्या हंबरड्याने घरातील माणसं जागी होऊन आरडाओरड करून वासराला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत बराच उशीर झाल्याने वासरू मरण पावले होते.गेल्या दोन वर्षांपासून मनोली गाव व परिसरात बिबट्याचे दर्शन वेळोवेळी होत आहे. परिसरातील कुत्रे व शेळ्यांवर हल्ले होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रविवारी (दि.२७) रात्री मनोली गावचे पोलीसपाटील गोरख शिवलाल घोडे यांच्या गोठ्यात वासरू बांधलेले असताना बिबट्याने अचानक येऊन त्यावर हल्ला केला. गायीच्या हंबरड्यामुळे घरातील त्यांचे भाऊ दत्तूू घोडे हे बघावयास गेले असता त्यांना बिबट्या वासरू खातांना दिसला. त्यांनी आरडाओरडा केला. परिसरातील लोक जमा झाल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. वासराने तोपर्यंत प्राण सोडलेले होते. अशा घटनांमुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून, वनविभागाने लवकर पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 5:36 PM