ज्ञानेश्वर आघाव शेतात वस्तीवर राहतात. त्यांच्या राहत्या घराजवळ जनावरांचा गोठा आहे. शुक्रवारी (दि.२५) संध्याकाळी जनावरांना चारा देऊन सर्व झोपी गेले असताना बिबट्याने हल्ला केला. वासराची मान पकडून त्याला जवळच्या शेतात ओढून नेले. बिबट्याने तेथून पोबारा केला असला तरी तो जवळपास असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे वनविभागाने या परिसरात पिंजरा लावला आहे. गोदाकाठ भागात वारंवार बिबट्याचे हल्ले होण्याच्या घटना वाढत आहेत.
गोदाकाठ भागात गोदावरी, कादवा या दोन नद्यांच्या खोऱ्यात काळी कसदार जमीन असल्यामुळे ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. बिबट्याला लपण्यासाठी ऊसपीक सोयीचे असल्याने या परिसरात सातत्याने बिबट्याचे दर्शन नागरिकांना होत असते. रात्री अपरात्री शेतकऱ्यांना शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. शेतात शेतमजूर काम करत असतात तसेच अनेक शेतकरी शेतात वस्ती करून रहातात. त्यामुळे या परिसरात कायम बिबट्याची दहशत असते.