महादेवपूर गावातील शेतकरी अर्जुन भागवत यांच्या घराच्या मागे पशुधन बांधण्यासाठी गोठा आहे. यामध्ये सर्व पशुधन बांधलेले असताना मध्यरात्रीच्या सुमारास वासराच्या ओरडण्याचा आवाज आला. भागवत यांनी गोठ्याकडे धाव घेतली असता बिबट्याने वासरावर हल्ला केल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. मात्र तोपर्यंत बिबट्या तिथून पसार झाला होता. सकाळी या घटनेची माहिती वन विभागाला समजताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. दरम्यान, गेल्या काही दिवसापासून महादेवपूर, नाईकवाडी, साडगाव, वडगाव, लाडची, गिरणारे, दुगाव, गंगाव्हरे, गोवर्धन, मुक्त विद्यापीठ परिसर, चांदशी, जलालपूर शिवारात बिबट्याचे दर्शन होत असून, त्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. या भागात वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नितीन भागवत, साहेबराव भागवत, संजय भागवत, विकास भागवत, अजय भागवत यांनी केली आहे.
माहादेवपूरला बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 4:11 AM