लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : नाशिक तालुक्यातील महादेवपूर शिवारातील घोलपवस्ती जवळील असलेल्या दौलत घोलप यांच्या मळ्यात बांधलेल्या दोन वर्षाच्या खिल्लारी जातीच्या वासरूवर बिबट्याने पहाटेच्या सुमारास अचानकपणे हल्ला केल्याने वासरू जागीच ठार झाले. घोलप सकाळी शेतात पाणी भरण्यासाठी गेले असता त्यांना वासरू मयत अवस्थेत दिसल्याने एकच खळबळ उडाली. बिबट्याच्या हल्ल्याने वस्ती परिसरात भीतीचे वातावरण पसरले. बिबट्याला पिंजरा लावून पकडण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
नाशिक शहर परिसरासह ग्रामीण भागात दहशत माजविणा-या बिबट्याचे वन विभागासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. नाशिक परिसरात दर दिवसाआड बिबट्याच्या दर्शन होत असतानाच तालुक्यातील महादेवपूरजवळील घोलपवस्तीत दौलत घोलप हे सकाळी आपल्या शेतात पाणी भरण्यासाठी गेले असता त्यांना वासरू मयत अवस्थेत दिसले. त्यांनी काही अंतरावर शोध घेतला असता बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले त्यांनी लागलीच गावातील मंडळींना व वनविभागाशी संपर्क साधून झालेल्या घटनेची माहिती दिली. वन विभागाचे पथक लागलीच त्याठिकाणी येऊन वासराचा पंचनामा करून पुढील कारवाई सुरु केली. दरम्यान, या आधीही या परिसरातील महादेवपूरचे पोलीसपाटील श्रीराम पाटील यांच्या कुत्र्याचा बिबट्याने फडशा पडला होता. मनोली गावचे पोलीसपाटील गोरख शिवलाल घोडे यांच्या गोठ्यातील वासरूवर हल्ला करून ठार केले होते, तसेच मुक्त विद्यापीठ परिसरातील विजू शिंदे यांच्याही कुत्र्याचा बिबट्याने फडश्या पाडला. अशा एक ना अनेक घटनांनी महादेवपूर परिसरासह दुगाव, मनोली, मातोरी, मुंगसरा, वाडगाव, नाईकवाडी, मखमलाबाद, जलालपूर, चांदशी, नाशिक डावा कालव्याचे शेतमळे परिसरात बिबट्याच्या दर्शनाने नागरिक भयभीत झाले असून त्यांना रात्री-अपरात्री घरातून बाहेर निघावे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण असून वनविभागाने लवकर पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.