आडगाव : नाशिक-औरंगाबादरोडवरील माडसांगवी शिवारातील चारी नंबर सात येथील डॉ. समीर पेखळे यांच्या मळ्यात शुक्रवारी मध्यरात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गायीचे वासरू आणि म्हशीचे पारडू ठार झाल्याची घटना घडली. परिसरातील बिबट्याचे ठसे आढळून आल्याने तसेच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर हा हल्ला बिबट्यानेच केल्याचे निष्पन्न झाले असून, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.माडसांगवी शिवारात डॉ. पेखळे यांच्या मळ्यात शिवाजी आढाव हे काम बघतात. त्यांच्या राहत्या घरापासून दोनशे फुटावर गोठा असून, या गोठ्यात तीन म्हशी, चार गायी, दोन बैल तसेच गाईचे वासरू आणि पारडू बांधण्यात आलेले होते. रात्री १० वाजेच्या सुमारास आढाव यांनी गोठ्याची पाहणी करून घरी गेले व पहाटे पाच वाजता ते नेहमीप्रमाणे गोठ्यात गेले असता त्यांना वासरू आणि पारडू मृत अवस्थेत पडलेले दिसले. वासराच्या मानेला बिबट्याच्या दाताचे निशाण आणि पोटातून आतडी बाहेर पडलेली दिसली. तसेच पारडाचेही पोट फाडलेले दिसले. गोठ्यापासून घर जवळ असले तरी रात्रीच्या वेळी कसलाही आवाज आला नसल्याचे आढाव यांनी सांगितले.या घटनेचे वृत्त सकाळी परिसरात पोहचताच नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली. पेखळे यांच्या शेतात तसेच गोठ्याच्या बाहेर बिबट्याच्या पायाचे ठसे आढळल्याने हा हल्ला बिबट्यानेच केला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यामुळे वनविभागाला कळविण्यात आले. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.जवळच उसाचा मळा असल्याने बिबट्या त्यात लपला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पारडू आणि वासरू हे दोºयाने बांधलेले असल्यामुळे बिबट्याला ते ओढून नेता आले नाही.
माडसांगवीत बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:51 AM