एकलहरे : निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा एकलहरे येथील ६६० मेगावॉट प्रकल्पाचा मुद्दा पुढे आला असून, सदर विषयाला राजकीय स्वरूप प्राप्त होण्यापूर्वीच येथील तरुणांनी प्रकल्प सुरू करण्याचा ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करीत आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे.एकलहरे वसाहतीत आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी येथील तरुणांनी एकत्र येत मारुती मंदिरात बैठक घेतली. अध्यक्षस्थानी अतुल धनवटे होते. यावेळी एकलहरे येथे ६६० मेगावॉट प्रकल्प मंजूर असूनही शासकीय पातळीवर चालढकल करण्यात आल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. आतापर्यंत अनेक निवेदने शासनाला व महाजेनकोला देण्यात आली आहेत. मात्र केवळ आश्वासना पलीकडे काहीच हालचाली झालेल्या नाहीत. आंदोलनाची रूपरेषा ठरविताना येत्या ४ तारखेला एकलहरेतील प्रशासकीय इमारतीसमोरील क्रांती मैदान येथे एक दिवसाचे लाक्षणिक आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. सुरुवातील एक दिवसाचे लाक्षणिक आंदोलन, त्यानंतरही दखल न घेतल्यास टप्प्याटप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा निर्णय घेण्यत आला. बैठकीत प्रकल्प बचाव समितीचे कार्याध्यक्ष अनिल जगताप, उपाध्यक्ष सागर जाधव, लकी ढोकणे, मंगेश काकड, नीलेश छाजेड, सेवानिवृत्त संघटनेचे पंजाबराव खंडारे, बळीराम कांबळे, शानू निकम, पप्पू जाधव, वैभव घुगे आदी उपस्थित होते.
प्रकल्पासाठी आंदोलनाची हाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 12:33 AM