मनोज देवरे,
कळवण : मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज कळवण तालुक्याच्या वतीने शनिवारी (दि.२) शहरातील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याला अभिवादन करुन निषेध नोंदविण्यात आला. तरुणांवर लाठीहल्ला करणाऱ्या संबंधितावर कारवाई करावी,गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ रविवारी (दि.२) कळवण बंदची हाक देण्यात आली.
मराठा क्रांती मोर्चा व मराठा सकल समाज कळवण तालुक्याच्या वतीने प्रशासनास निवेदन देण्यासंदर्भात कोल्हापूर फाट्यावरील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या कार्यालयावर शिष्टमंडळाने धाव घेतली मात्र शनिवारची शासकीय सुट्टी असल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी उपस्थित नव्हते.
त्यामुळे इमारतीच्या गेटला शिष्टमंडळाने निवेदन चिटकून ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ या घोषणानी परिसर दणाणून सोडला. कळवण पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक खगेंद्र टेभेकर यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले. रविवारी (दि.३) घटनेच्या निषेधार्थ कळवण शहर बंद करण्यात येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.