नाशिक- मराठा समाजाच्या आरक्षणावरील स्थगिती उठवावी यासाठी सर्व आमदारांनी तातडीने मागणी करावी असे निवेदन बुधवारी (दि.१६) मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शहरातील तीन आमदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली त्याच बरोबर महाअधिवेशासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी न करणा-यांनी मतदार संघातील राजकिय भवितव्याचा विचार करावा असा इशारा देखील देण्यात आला आहे.मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर, गणेश कदम, तुषार जगताप, राजु देसले यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन दिले. मराठा समाजाच्या आरक्षणाला ९ सप्टेंबर रोजी सर्वाेच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाचा सन्मान असला तरी आता अधिक खोलात न जाता सर्व राजकिय विचार सरणी बाजुला ठेवून वर्षानुवर्ष मराठा समाजाची मागणी असलेल्या आरक्षणासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यामुळे यासंदर्भात मराठा समाजाने केलेल्या सहकार्याची जाणिव ठेवून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तसेच उपसमितीचेअध्यक्ष अशोक चव्हाण यांना मरठा आरक्षण आणि समाजाच्या अन्य मागण्यांसाठी दोन दिवसात महाअधिवेशन घ्यावे तसेच आरक्षण स्थगितीच्या निर्णयाच्या संदर्भात शासनाने लवकरात लवकर पुर्नविचार याचिका दाखल करावी अशी मागणी करण्यासाठी आमदार खासदारांना निवेदन देण्यात येणार आहे. बुधवारी (दि.१६) नाशिक पश्चिमच्या आमदार सीमाताई हिरे, मध्य नाशिकच्या आमदार प्रा.देवयानी फरांदे आणि पूर्व नाशिकचे आमदार अॅड. राहूल ढिकले यांना निवेदन देण्यात आले. चालु शैक्षणिक वर्षात वैद्यकिय व अन्य उच्च शिक्षण शाखांमध्ये तसेच शालेय प्रवेशातील देखील आरक्षण रद्द करण्यात आले आहे.त्यामुळे स्थगिती पूर्वी झालेले शैक्षणिक प्रवेश आणि नोकरभरतीतील आरक्षण जैसे ठेवण्यासाठी वट हुकूम काढण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते तसेच आपापल्या पक्षांचे नेते यांना पत्र पाठवावे अशी मागणी देकील निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी आशिष हिरे, शरद तुंगार, शिवाजी मोरे, प्रमोद जाधव, माधवी पाटील, निलेश गायके, योगेश गांगुर्डे, तुषार भोसले, संतोष टिले, दीपक जाधव, भारत पिंगळे यांच्यासह अन्य कायकर्ते सहभागी होते.