देवळाली कॅम्पवासीय छावनी परिषदेला घरपट्टी, पाणीपट्टीचा भरणा करतात. मात्र कोरोनाच्या महामारीत मृत्यू झालेल्या व्यक्तीवर छावणी परिषदेच्या हद्दीतील स्मशानभूमीत अंतिम विधीला छावनी प्रशासन परवानगी देत नाही. गेल्या महिन्याभरात अनेक नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, मागील आठवड्यात तर एकाच कुटुंबातील दोन सदस्यांचा दोन दिवसांच्या अंतराने मृत्यू झाला. या दोघांवरही नाशिकरोडच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. छावणी परिषदेच्या नकारामुळे गेल्या १५ दिवसात तीन, चार कुटुंबाना संसरी, नाशिकरोड, विहीतगावसह दसक पंचकला जाऊन विधी पूर्ण करावा लागला आहे. मात्र जे कुटुंब परवानगीशिवाय विधी करत आहे. त्यांची मात्र कुठलीही अडवणूक केली जात नसल्याने प्रशासकीय नियम निवडक नागरिकांनाच का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या संदर्भात देवळाली छावनी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कारास छावणी प्रशासनाचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 4:14 AM