लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : उन्नत शेती व समृद्ध शेतकरी या मोहिमेंतर्गत तालुक्यातील विखरणी व परिसरातील शेतकरी वर्गासाठी विखरणी येथे तालुका कृषी विभागाच्या वतीने मार्गदर्शन शिबीर व जनजागृती कार्यक्रम घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी अभय फलके, कृषी अधिकारी सोनवर, कालेकर व शिंदे यांनी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी शेतीचे नियोजन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन केले. ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ या मोहिमेअंतर्गत जनजागृती करून प्रमुख पिकांची प्रत्यक्षात प्राप्त होणारी उत्पादकता व या पिकाच्या आनुवंशिक उत्पादन क्षमतेतील तफावत कमी करून शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीककर्जाच्या रकमेपेक्षा अधिक आर्थिक उत्पन्न प्राप्त करून देणे आणि पिक विमा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करून घेऊन नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षित करणे या प्रमुख उद्दिष्टांची माहिती कृषी अधिकारी अभय फलके यांनी दिली. तसेच शेतकऱ्यांना खरीप हंगामातील निविष्ठा वाटपाचे नियोजन, पीक प्रात्यक्षिके, शेतकरी प्रशिक्षण व सहल, सूक्ष्म सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, सामूहिक शेततळे, कांदाचाळ, जमीन आरोग्य पत्रिका आदी विषयांसह उत्पादन खर्च कमी करण्याच्या सर्वसाधारण उपाययोजनेमध्ये बियाणे, रासायनिक खते व किडनाशके याविषयी कृषी अधिकारी सोनवर, कालेकर व शिंदे यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. उपस्थित शेतक ऱ्यांनी पिके घेत असताना येणाऱ्या अडचणींविषयी अनेक शंकांचे निरसनही करण्यात आले. या कार्यक्रमास सरपंच रामदास खुरसने, ज्येष्ठ समाजसेवक कौतिक नाना पगार, तंटामुक्ती अध्यक्ष श्रीहरी खरे, अशोक गोडसे, बापूसाहेब शेलार, विठ्ठल शेलार, गोरख अहिरे, अशोक बंदरे, तुकाराम शेलार, बाजीराव शेळके, निवृत्ती शेलार, युसुब दरवेशी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
उन्नत समृद्ध शेतकरी मोहिमेंतर्गत शिबिर
By admin | Published: May 28, 2017 12:08 AM