सिन्नर : इगतपुरी तालुक्यातल्या; परंतू सिन्नर मतदारसंघात समाविष्ट असलेल्या टाकेद गटातील काननवाडी येथील ग्रामस्थांना निवडणूक शाखेच्या (महसूल) कर्मचाऱ्यांनी विविध दाखल्यांचे वाटप करण्यासाठी शिबिर घेण्याचे दिलेले आश्वासन शनिवारी पूर्ण केले. काननवाडी (खेड) येथील विद्यार्थी व ग्रामस्थांनी विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी शिबिरात अर्ज केले असून, या चारशे दाखल्यांचे काम पूर्ण करून दोन दिवसांत त्याचे वितरण केले जाणार आहे. सिन्नर मतदारसंघातील टाकेद गटात असलेल्या व खेड ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत असणाऱ्या काननवाडी येथील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकला होता. काननवाडी येथील २७६ या मतदान केंद्रांवर ८८७ मतदार आहेत. यावेळी ग्रामस्थांनी रस्त्यांच्या समस्येसह विद्यार्थी व ग्रामस्थांना विविध शासकीय दाखले मिळविण्यासाठी येणाऱ्या अडचणींचा पाढा वाचला होता. यावेळी चावडे यांच्यासह उपस्थितीत निवडणूक कर्मचाऱ्यांनी काननवाडी येथे शिबिर घेऊन गावातच दाखल्यांचे वितरण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार इगतपुरीचे तहसीलदार महेंद्र पवार, सिन्नरचे तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांच्या समंजस्यातून मतदानाच्या अगोदरच काननवाडी येथे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात १७० नागरिकांनी उत्पन्न, अधिवास, डोंगरी, राष्ट्रीयीत्व अशा विविध शासकीय दाखल्यांसाठी सुमारे ४०० अर्ज दाखल केले. दोन दिवसांत सदर दाखले बनवून काननवाडी ग्रामस्थांना वितरित केले जाणार आहे. सदर शिबिर यशस्वीतेसाठी नायब तहसीलदार कैलास चावडे, मंडळ अधिकारी सुभाष गिते, पी. एन. सानप, तलाठी सविता म्हसाळ, गोविंद धाडवड, डी. एस. लगड यांच्यासह इगतपुरी तहसील कार्यालय व सेतूच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी तुकाराम धुपेकर, पांडुरंग आगिलवे, अनिल गोर्डे, संतू तुंगार, बहिरू धाधवड, एकनाथ बोटनर यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)
काननवाडी येथे मतदार जागृती अभियानातून शिबिर
By admin | Published: October 11, 2014 10:14 PM